सांगोला : चालू वर्षी रब्बी हंगाम पेरणीपूर्वी व पेरणीनंतर पडलेल्या पावसामुळे यंदा ज्वारीचे क्षेत्र ५० टक्के घटले असून, पाण्याच्या उपलब्धतेमुळे मकेचे क्षेत्र १७८ टक्के दुप्पटीने वाढले आहे.
तालुक्यात रब्बीज्वारी १८,९७३ हेक्टर क्षेत्रावर (५०:६२ टक्के) तर मका ९,१९९ हेक्टर क्षेत्रावर (१७८ टक्के) पेरणी झाली आहे. आतापर्यंत तालुक्यात एकूण ४४,४६४ पैकी २८,६०६ हेक्टर क्षेत्रावर १७५ टक्के पेरणी झाल्याचे तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी सांगितले.
सांगोला तालुका तसा रब्बीचा तालुका म्हणून ओळखला जायचा, परंतु गेल्या ३-४ वर्षांच्या काळात वाढते पर्जन्यमान, तसेच टेंभू म्हैसाळ, नीरा उजवा कालव्यातून हमखास शेतीला पाणी मिळू लागल्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पद्धत बदलून खरीप हंगामातील पिके घेण्याकडे अधिक कल वाढला आहे.
चालू वर्षी खरीप हंगामातील पिकांची पोळा सणानंतरही काढणी मोडणीची कामे उशिरापर्यंत चालू होती. त्यामुळे रब्बी ज्वारी पेरणीला विलंब होत गेला.
त्यातच सुरुवातीला ज्वारी पेरणी योग्य पाऊस पडला नाही, तर पुन्हा पाऊस पडल्यानंतर वाफसा येण्यात वेळ गेल्यामुळे रब्बी ज्वारीच्या पेरण्या खोळंबल्या होत्या.
त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी मका पेरणीला प्राधान्य दिले, शिवाय शेतकरी वर्षातून दोन वेळा मक्याचे उत्पादन घेत आहेत. त्यामुळे तालुक्यात मक्याचे क्षेत्र दुपटीने वाढले, तर ज्वारीचे क्षेत्र ५० टक्क्याने घटले आहे.
तसेच हरभऱ्याचे क्षेत्र वाढले असून, ८३९ हेक्टर क्षेत्रावर १०९ टक्के पेरणी झाली आहे. दरम्यान, ज्वारीचे क्षेत्र घटल्यामुळे पुढे वर्षभर जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण होणार आहे.
रब्बी हंगाम पिकनिहाय आकडेवारीरब्बी ज्वारी ३७,४७९ पैकी १८,९७३ हेक्टर, गहू ८२२ पैकी ५९५ हेक्टर, मका ५,१५६ पैकी ९,१९९ हेक्टर, हरभरा ७६८ पैकी ८३९ हेक्टर, पूर्वहंगामी ऊस १,१६६ पैकी ३६१ हेक्टर असे एकूण ४४,४६४ पैकी २८,६०६ हेक्टर क्षेत्रावर १७५ टक्के पेरणी झाली आहे.