अरुण लिगाडे
सांगोला : टेंभू, म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजरीचे क्षेत्र कमी करून पहिल्यांदाच सुमारे २५ हजार ३४३ हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात मकापीक घेतले आहे. त्यामुळे यावर्षी मका लागवडीत सांगोला तालुका महाराष्ट्रात आघाडीवर असल्याचे तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.
गेल्या दोन चार वर्षांच्या कालावधीत टेंभू व म्हैसाळ योजना, तसेच नीरा उजवा कालव्यातून शाश्वत पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल केला आहे. गेल्या तीन चार वर्षात शेतकऱ्यांचा मका पीक घेण्याकडे कल वाढला आहे.
उत्पादनाबरोबरच जनावरांसाठी मक्याच्या चाऱ्याचाही शेतकरी मोठ्या प्रमाणात वापर करू लागले आहेत, तसेच मक्यापासून भरडा, पशुखाद्य म्हणून, तसेच मुरघास बनवण्यासाठी वापर केला जातो.
यंदा जून महिन्यात तालुकाभर सर्वदूर पाऊस झाला. त्यामुळे सांगोला तालुक्यात सुमारे २५,३४३ हेक्टर क्षेत्रावर अधिकची मका पेरणी झाली असून, बाजरी १५,५९६ हेक्टर सरासरीपेक्षा ११,८०७ हेक्टर क्षेत्रावर घट झाली आहे.
पाण्यामुळे खरीप हंगामातील बाजरी, मका, उडीद, तूर आदी सर्वच पिके जोमात आहेत, तर रबी हंगामात ज्वारीबरोबर मक्याचे १६ हजार हेक्टर क्षेत्र, तसेच उन्हाळी ५ हजार हेक्टर क्षेत्रावर मका पेरणी क्षेत्र वाढले आहे.
सांगोला तालुक्यात मका लागवडीचे क्षेत्र जसे वाढले, तसे दुभत्या जनावरांची संख्याही वाढली आहे. दूध उत्पादक शेतकरी शेतात येऊन १,५०० ते २ हजार रुपये गुंठा दराने स्वतः मका तोडणी करून घेऊन जातात तसेच मक्याला २ हजार रुपये ते २,५०० रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. - नीलेश नष्टे, शेतकरी
खरीप रब्बी व उन्हाळी हंगाम, अशा तिन्हीही हंगामांत हमखास येणारे पीक म्हणून मका पीक आहे; परंतु शेतकऱ्यांनी मका पीक काढल्यानंतर त्याच क्षेत्रात मका पीक घेऊ नये व पिकाची फेरपालट करावी. यंदाच्या वर्षी सांगोला तालुक्यात शेतकऱ्यांनी तब्बल २५ हजार ३४३ हेक्टर क्षेत्रावर विक्रमी मका पीक घेतले आहे. हा एक विक्रमच म्हणावा लागेल. - शिवाजी शिंदे, तालुका कृषी अधिकारी