Join us

Organic Fertilizer गाजर गवतापासून या सोप्या पद्धतीने तयार करा दर्जेदार सेंद्रिय खत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 12:44 PM

गाजर गवतापासून सेंद्रिय खत निर्मिती

गाजर गवत शेतामध्ये मुख्य पिकासोबत अन्नद्रव्यासाठी स्पर्धा करते. त्यामुळे मुख्य पीक उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता असते. त्यासाठी गाजर गवत शेताबाहेर काढून टाकने आवश्यक आहे. याच गाजर गवता पासून उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत तयार करता येते. या खताचा वापर शेतामध्ये केल्यास जमीन सुपीकता वाढीस मदत मिळते.

पिक उत्पादनामध्ये रासायनिक खताच्या सातत्याने होणाऱ्या अतिवापरामुळे दिवसेंदिवस हे जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे त्यासाठी रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय खते, कंपोस्ट खते यांचा वापर वाढविणे आवश्यक आहे. गाजर गवतापासून चांगल्या दर्जाचे कंपोस्ट खत तयार होऊ शकते. त्यामुळे दुहेरी फायदे होऊ शकतात. शेतातील गाजर गवताचे प्रमाण देखील कमी होईल शिवाय खत निर्मितीतून जमीन सुपीकता वाढीस मदत मिळेल.

गाजर गवत हे प्रामुख्याने काँग्रेस, चटक चांदणी, इत्यादी नावाने ओळखले जाते. हे गवत शेत जमीन, मानव, प्राणी, पर्यावरण आणि जैवविविधतेसाठी अत्यंत घातक आहे. दरवर्षी गाजर गवताच्या समूळ निर्मूलनासाठी १६ ते २२ ऑगस्ट या कालावधीत गाजर गवत जागरूकता सप्ताह आयोजित केला जातो. हे बहुवार्षिक गवत अतिशय वेगाने वाढते. शेताचे बांध, पडीक जमीन, कुरणे, रेल्वे मार्ग ,रस्ते, औद्योगिक वसाहती, त्यांच्या बाजूने उगवलेले दिसून येते.

गाजर गवतापासून सेंद्रिय खत बनवण्याची पद्धत

नाडेप किंवा खड्डा पद्धतीद्वारे कंपोस्ट तयार करण्यासाठी फुलावर येण्यापूर्वीची गाजर गवताची त्याची झाडे गोळा करून घ्यावीत. सुमारे १०० किलो गाजर गवतापासून ३५ ते ४५ किलो सेंद्रिय खत मिळू शकते. सेंद्रिय खत निर्मितीसाठी पाणी साचणार नाही अशी जागा निवडावी. त्या जागी तीन फूट खोल, सहा फूट रुंद, आणि दहा फूट लांबीचा खड्डा तयार करावा.

खड्ड्याचा आकार आवश्यकतेनुसार कमी जास्त करता येतो. परंतु खोली तीन फूट ठेवावे. खड्डा भरण्यासाठी १०० किलो गाजर गवत, शेण १०० किलो, युरिया किंवा रॉक फॉस्फेट १० किलो, माती २०० किलो व पाणी इत्यादी साहित्य लागते. शेतातून किंवा परिसरातून फुलावर येण्यापूर्वी ची गाजर गवताची झाडे गोळा करून आणावीत. ही झाडे तयार केलेल्या खड्ड्याच्या पृष्ठभागावर १०० किलो प्रमाणे पसरावे.

त्यावर पाचशे ग्राम युरिया किंवा तीन किलो रॉक फॉस्फेट शिंपडावे. असे प्रत्येक थरावर थर करावे. सेंद्रिय पिकांमध्ये या खताचा वापर करावयाचा असल्यास युरियाचा वापर करणे टाळावे. त्याऐवजी ट्रायकोडर्मा विरीडी ५० किलो याप्रमाणे वापर करावा. पहिला थर टाकल्यानंतर जमिनीच्या पृष्ठभागापासून एक फुट उंचीपर्यंत खड्डा भरून घ्यावा.

प्रत्येक थरावर सर्व साहित्य एक समान वापर करून घ्यावा. थर बनविताना प्रत्येक थरा नंतर पायाने दाब द्यावा. त्यामुळे गाजर गवत घट्ट होण्यास मदत होईल. नंतर खड्डा घुमट आकारात भरून घ्यावा. शेण व माती किंवा बुस्सा असा यांच्या मिश्रणाने झाकून घ्यावा. साधारणपणे चार ते पाच महिन्यात चांगल्या प्रकारे सेंद्रिय खत तयार होते.

सेंद्रिय खत तयार करताना घ्यावयाची काळजी

१) खड्ड्याची जागा उघड्यावर किंवा सावलीत असावी.

२) खड्डा भरून झाल्यानंतर तो शेण व माती यांच्या मिश्रणाने झाकून ठेवावा.

३) कंपोस्ट मधील ओलाव्याची पातळी वेळोवेळी तपासावी खड्ड्यात कोरडेपणा असल्यास छिद्र करून त्यातून पाणी घालून छिद्र बंद करावे.

वापर प्रति हेक्टर क्षेत्रात

भाजीपाला पिकांसाठी चार ते पाच टन/व इतर पिकांमध्ये पेरणी वेळी अडीच ते तीन टन वापर करता येतो.

तयार कंपोस्ट ची चाळणी

खड्ड्यातून कंपोस्ट काढून घेतल्यानंतर त्यात काही देठ शिल्लक दिसून येतील. त्यावरून गाजर गवत वनस्पती विघटित झालेली नसल्याचे दिसून येईल. पण प्रत्यक्षात ती चांगली विघटीत झालेली असेल. चाळणीनंतर चाळणी शिल्लक राहिलेले बाजूला काढून टाकावे. हे सेंद्रिय खत सुकण्यासाठी सावलीच्या ठिकाणी पसरून ठेवावे. या कोरड्या कंपोस्टचा डिग करून घ्यावा..

लेखकप्रा. संजय बाबासाहेब बडे सहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग , दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर.

टॅग्स :खतेसेंद्रिय शेतीसेंद्रिय खतशेतीशेतकरीशेती क्षेत्र