महाराष्ट्र राज्यात हरभरा हे रबी हंगामातील महत्वाचे कडधान्य पीक आहे. राज्यामध्ये हरभरा या पिकाचे क्षेत्रफळ २७ लाख हेक्टर क्षेत्र असून उत्पादन ३०.४६ लाख टन आहे. विदर्भामध्ये ९.१० लाख हेक्टर क्षेत्र लागवडी खाली असून उत्पादन ११.४४ लाख टन आहे (२०२१-२२).
१०० ते ११० दिवसात हेक्टरी २० ते २२ क्विंटल उत्पादन देण्याची क्षमता या पिकात आहे परंतू या पिकावर बुरशीजन्य व विषाणुजन्य अशा प्रकारच्या अनेक रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यामूळे अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही. मर हा रोग फ्युर्जेरियम या जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे होतो. मर रोगामूळे १० ते १०० टक्के उत्पादनात घट येते. त्यामुळे या रोगाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे व ते केल्यास उत्पादनात निश्चित भर पाडता येईल.
मर रोगाची लक्षणे
- रोग पिकाच्या सर्वच वाढीच्या अवस्थेमध्ये आढळून येतो.
- या बुरशीचा रोपात प्रवेश झाल्यानंतर हळूहळू ही बुरशी झाडात वाढते व नंतर पाने पिवळसर पडतात.
- या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास झाडाची पाने पिवळे पडून कोमजतात, शेंडे मलूल होतात, झाडांना उपटून बघितल्यास झाडाच्या खोडाचा भाग ज्या ठिकाणी जमिनीचा संपर्क येतो त्याचे थोडेवर पासून तर जमिनीतील काहीभाग बारीक झालेला आढळतो.
- फुलोऱ्याच्या काळात रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर झाडे ऐकाएकी मरायला सुरूवात होते. शेताच्या एका विशिष्ट भागामध्ये असे बरीच झाडे मलूल झालेली आढळतात.
- झाडाच्या मुळापासून उभाकाप घेतल्यास त्या ठिकाणी काळ्या रंगाची उभी रेघ आढळून येते.
मुळकुज रोग लक्षणे
- या रोगाचा प्रादुर्भाव रोपाअवस्थेत जास्त आढळतो (६ आठवडयापर्यंत)
- सर्वप्रथम झाडाची पाने पिवळी पडतात नंतर संपुर्ण झाड पिवळे पडतात.
- रोगीट झाडे उपटल्यास जमिनीलगतच्या खोडावर व सोट मुळावर पांढरी बुरशी आढळते.
व्यवस्थापण
- एकाच शेतात हरभराचे पीक सतत घेणे टाळावे. पिकांची फेरपालट करावी.
- रोग प्रतिकारक जाती जाकी ९२१८, पिकेव्ही काबूली २, पिकेव्ही काबूली ४, पिडीकेव्ही कांचन, पिडीकेव्ही कनक इत्यादी वाणांचा वापर करावा.
- पेरणीपूर्वी हरभऱ्याच्या बियाण्यास टेबूकोनॅझोल ५.४ टक्के डब्ल्यूडब्ल्यू एफ एस या बुरशीनाशकाची ४ मि.ली. अधिक ४० ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति १० किलो बियाणे या प्रमाणे बीज प्रक्रिया करावी.
- मागील वर्षी रोग असलेल्या शेतात तसेच पाणी साचणाऱ्या शेतात हरभऱ्याचे पीक घेणे टाळावे आणि रोगट अवशेष जाळुन नष्ट करावे.
कडधान्य संशोधन विभाग
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला