सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्यांच्या योग्य व्यवस्थापनाकरीता शेतात आठवडयातून किमान दोन वेळा फिरुन किडींकरीता सर्वेक्षण करावे. किडीने आर्थिक नुकसानीच्या पातळीची मर्यादा गाठल्यासच कीटकनाशकाची फवारणी करावी.
सोयाबीनचे पीक साधारणतः २० ते २५ दिवसांचे झाले की त्यावर पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. सोयाबीन वाढीच्या अवस्थेत १० ते २० टक्के पाने खाल्ल्यामुळे जरी फारसे नुकसान होत नसले तरी फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या वेळेस अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट येते. सोयाबीन पिकाचे जास्त उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने त्यावरील किडींचे योग्य रितीने व्यवस्थापन करणे महत्वाचे ठरते. किडींच्या प्रभावी व्यवस्थापनाकरीता किडींची ओळख, नुकसानीची पध्दत आणि त्यांच्या व्यवस्थापनाकरीता करावयाच्या उपाययोजनेबाबत संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.
१.उंट अळी
चालतांना उंटासारखा बाक करत असल्यामुळे ही कीड सहज ओळखता येते. आली सडपातळ आणि फिक्कट हिरव्या रंगाची असून स्पर्श केल्यास गुंडाळी करून चटकन खाली पडते. अंडयातून निघालेल्या अळ्या प्रथम पानाचा हिरवा भाग खरवडून खातात तर मोठया अळ्या पानाला छिद्र पाडून पाने खातात. किडीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास फक्त शिराच शिल्लक राहतात. अळया फुलांचे व शेंगांचे नुकसान करतात. त्यामुळे उत्पादनात घट येते.
२.तंबाखूची पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा)
ही अळी मळकट हिरव्या रंगाची असून शरीरावर पिवळसर नारिंगी रेषा आणि काळे ठिपके असतात. अंडयातून निघालेल्या अळ्या सामुहिकपणे पानातील हिरवा भाग खातात व पानाची चाळणी करतात. अळ्या मोठ्या झाल्या की पूर्ण शेतात पसरतात आणि स्वतंत्रपणे पाने, फुले आणि शेंगा खातात. जास्त प्रादुर्भाव असल्यास अळ्या जमिनीलगतच्या फांद्यादेखील खातात आणि झाडाला पाने राहात नाहीत.
३.केसाळ अळी
अळी मळकट पिवळया रंगाची असून तिच्या शरीरावर दाट नारिंगी किंवा काळे केस असतात. अंगावरील दाट केसांमुळे ग्रामीण भागात या अळीला अस्वल म्हणतात. लहान अळया पानाच्या खालच्या बाजूस राहून अधाशीपणे त्यातील हरीतद्रव्य खातात त्यामुळे पाने पातळ व पांढऱ्या रंगाची दिसतात. मोठया अळया शेतभर पसरतात व वेगाने पाने खाऊन नुकसान करतात. प्रादुर्भाव तीव्र असल्यास झाडाचे फक्त खोडच शिल्लक राहाते. झाडाची वाढ खुंटते, फुले गळतात व शेंगा धरण्याची तसेच दाणे भरण्याची क्षमता देखील कमी होते तसेच दाण्याचा आकार लहान होतो. पीक लहान असतांना या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनाट मोठी घट येते.
४. हेलीकोवर्पा अर्मिजेरा (घाटेअळी)
अळी बहुभक्षी असून सोयाबीनच्या फुलोरा आणि शेंगांचे नुकसान करते. लहान अळी प्रथम पाने पोखरून खाते. सोयाबीनच्या फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत कळ्या, फुले आणि शेंगा खाऊन ही अळी पिकाचे जास्त नुकसान करते. शेंगात दाणे भरण्याच्या वेळेस मोठ्या शेंगांना अनियमित आकाराची गोल छिद्रे पाडून अळी कोवळे दाणे खाते. फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत प्रादुर्भाव होत असल्यामुळे नुकसानीची तीव्रता अधिक राहते.
सोयाबीनच्या पानांवर थोडी जरी छिद्रे दिसली किंवा एखाद दुसरी अळी निदर्शनास आली तरी नुकसानीच्या भितीने शेतकरी लगेच महागड्या कीटकनाशकांच्या फवारणीस सुरुवात करतात. त्यामुळे पिकाच्या उत्पादन खर्चात वाढ होते. सोयाबीन पीक सुरुवातीच्या अवस्थेत साधारणतः १५ ते २० टक्के पर्यंत पानांचे किडीने खाल्ल्यामुळे होणारे नुकसान सहन करु शकते व त्यामुळे उत्पादनात फारशी घट येत नाही. मात्र फुलोरा अवस्था आणि शेंगा कोवळया असतांना जर किडींच्या संख्येने आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास कीड व्यवस्थापनाचे उपाय योजणे आवश्यक ठरते.
सोयाबीन वरील पाने खाणाऱ्या अळयांची आर्थिक नुकसानीची पातळी खालीलप्रमाणे
पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी | १० अळ्या प्रति मीटर ओळीत |
पीक फुलोऱ्यावर असतांना | ४ अळ्या प्रति मीटर ओळीत |
शेंगा लागण्याच्या अवस्थेत | ३ अळ्या प्रति मीटर ओळीत |
किडीच्या एकात्मिक व्यवस्थापनाचे उपाय :
- बियाण्याचे आणि रासायनिक खताचे प्रमाण शिफारसीनुसारच वापरावे
- पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पीक तणमुक्त ठेवावे. किडींच्या पर्यायी खाद्य वनस्पतींचा नाश करावा
- मुख्य पिकाभोवती एरंडी, सुर्यफुल या सापळा पिकाची एक ओळ लावावी आणि त्यावरील स्पोडोप्टेरा आणि केसाळ अळ्यांचे अंडीपुंज आणि लहान अळयाग्रस्त पाने गोळा करुन अंडी, अळ्यांसह नष्ट करावीत.
- अळयांचे कीटकभक्षी पक्ष्यांद्वारे व्यवस्थापन करण्याकरीता शेतात एकरी १५ ते २० पक्षीथांबे लावावेत.
- स्पोडोप्टेरा आणि हेलिकोवर्पा अळीच्या व्यवस्थापनाकरीता शेतामध्ये एकरी ४ ते ५ कामगंध सापळे लावावेत. त्याकरीता अनुक्रमे स्पोडोल्यूर आणि हेलिल्यूर चा वापर करावा.सापळयात अडकलेल्या पतंगांचा केरोसीन किंवा कीटकनाशक मिश्रीत पाण्यात टाकून नाश करावा
- किडीचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्काची करावी.
निरीक्षणांती पाने खाणाऱ्या अळ्यांनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्याचे दिसून आल्यास व्यवस्थापनाकरीता खालीलपैकी कोणत्याही एका कीडनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
१) प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही २० मि.ली. किंवा
२) फ्ल्युबेंडीअमाईड ३९.३५ टक्के प्रवाही ३ मिली किंवा
३) फ्ल्युबेंडीअमाईड २० टक्के दाणेदार ५ ते ६ ग्रॅम किंवा
४) क्लोरॅन्ट्रॅनिलीप्रोल १८.५ टक्के प्रवाही ३ मिली किंवा
५) ब्रोफ्लानिलीड ३०० एस सी १७ मिली
मिश्र कीटकनाशकांचा वापर करावयाचा असल्यास
१) बिटा सायफ्ल्युथ्रीन ८.४९ + इमिडाक्लोप्रिड १९.८१ ओडी ७ मिली किंवा
२) थायमेथोक्झाम १२.६ टक्के + लॅम्डा सायहॅलोथ्रिन ९.५ टक्के प्रवाही २.५ मिली किंवा
३) क्लोरॅन्ट्रॅनिलीप्रोल ९.३० + लॅम्डा सायहॅलोथ्रिन ४.६० टक्के प्रवाही ४ मिली किंवा
४) नोव्हॅल्युरॉन ५.२५ + इंडोक्झाकार्ब ४.५० एस सी १७ मिली
यापैकी कोणत्याही एका कीडनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शिफारस केलेले कीडनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी (एकरी २०० लिटर पाणी) असून चायना स्प्रेयर करीता पाण्याचे प्रमाण तेच ठेवून कीटकनाशकाचे प्रमाण दुप्पट करावे तर पॉवर स्प्रेयरचा वापर करावयाचा झाल्यास पाण्याचे प्रमाण तेच ठेवून कीटकनाशकाचे प्रमाण तीनपट करावे.
किडींच्या प्रभावी व्यवस्थापनाकरीता योग्य वेळी, योग्य कीटकनाशकाची योग्य मात्रा, योग्य पद्धतीने वापरणे आवश्यक आहे. अन्यथा फवारणीचा खर्च वाया जाण्याची शक्यता असते.
- डॉ. चारुदत्त द. ठिपसे
विषय विषेषज्ञ (पीक संरक्षण), कृषि विज्ञान केंद्र, अकोला
संपर्क: ८२७५४१२०६२