Lokmat Agro >शेतशिवार > रब्बी हंगामात वाटाणा लागवडीचे व्यवस्थापन

रब्बी हंगामात वाटाणा लागवडीचे व्यवस्थापन

Management of pea cultivation during rabi season | रब्बी हंगामात वाटाणा लागवडीचे व्यवस्थापन

रब्बी हंगामात वाटाणा लागवडीचे व्यवस्थापन

महाराष्ट्रात वाटाणा पिकाची लागवड रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. वाटाण्याच्या ओल्या दाण्यांपासून भाजी व इतर अनेक खाद्यपदार्थ तयार करता येतात. याला भाजीअसाठी मोठ्या प्रमाणात मागणी असते.

महाराष्ट्रात वाटाणा पिकाची लागवड रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. वाटाण्याच्या ओल्या दाण्यांपासून भाजी व इतर अनेक खाद्यपदार्थ तयार करता येतात. याला भाजीअसाठी मोठ्या प्रमाणात मागणी असते.

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्रात वाटाणा भाजीपाला पिकाची लागवड रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. वाटाण्याच्या ओल्या दाण्यांपासून भाजी व इतर अनेक खाद्यपदार्थ तयार करता येतात. वाटण्याचे दाणे वाळवून हवाबंद करून बराच काळ साठवून ठेवता येतात. हिरवे ओले वाटाणे वाळवून त्यापासून डाळ बनविता येते. वाळविलेल्या वाटाण्यांचा उपयोग भाजीसाठी करता येतो. वाटाण्यामध्ये कार्बो प्रोटीन्स तसेच फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम ही खनिजे आणि अ, ब व क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. वाटाणा हे पीक द्विदल वर्गात मोडत असल्याने हवेतील नत्र शोषून घेण्याची क्रिया मुळावरील गाठीद्वारे होते. त्यामुळे जमिनीचा कस वाढण्यास मदत होते.

लागवडीचा हंगाम
महाराष्ट्रातील काही भागात वाटाणा हे पीकखरीप हंगामात जुलैमध्ये लागवड केली जाते परंतु हे पीक थंड हवामानात येणारे असल्यामुळे महाराष्ट्रात याची लागवड ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत लागवड करणे फायद्याचे ठरते.

हवामान
या पिकाला थंड हवामान (१०-१८ डी. सें. पर्यंत) चांगले मानवते. कडाक्याची थंडी, धुके या पिकास मानवत नाही. फुले येण्याच्या वेळेला कोरडे, उष्ण हवामान असल्यास शेंगात बी धरत नाही त्यामुळे उत्पादन कमी होते. या कालवधीमध्ये तापमान वाढल्याने दाण्याची गोडी आणि कोवळेपणा जाऊन ते कडक होऊन पिठूळ लागतात व त्यांना चव राहत नाही.

जमीन
वाटाणा पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येत असले तरी हलक्या जमिनीत पीक लवकर तयार होते. तर मध्यम भारी पण भुसभुशीत जमिनीत पीक तयार होण्यास जास्त कालावधी लागतो. मात्र या जमिनीत उत्पादन चांगले मिळते. वाटाण्याच्या पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत, कसदार, रेतीमिश्रित आणि ५.५ ते ६.७ सामू असलेली जमीन निवडावी.

पूर्वमशागत
वाटाणा हे चांगले उत्पादन देणारे पीक असल्यामुळे त्याची पूर्वमशागत योग्य रीतीने करून जमीन चांगली भुसभुशीत करावी. त्यामुळे मुळ्या चांगल्या वाढतात आणि भरपूर अन्नद्रव्ये शोषून घेऊन झाडाची वाढ व्यवस्थित होते. त्यासाठी उभी आडवी नांगरट करून २-३ कुळवाच्या पाळ्या  द्याव्यात. ढेकळे व्यवस्थित फोडावीत व जमीन सपाट करावी.

बियाणे
पेरणीसाठी पाभरीने पेरल्यास हेक्टरी ६० ते ७० किलो बियाणे लागते. पण जर टोकण पद्धतीने लागवड केली तर हेक्टरी २०-३० किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बेन्डॅझीम ३ ते ४ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम किवा कॅप्टन ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बिजप्रक्रिया करावी. त्यामुळे अनेक प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. त्याचप्रमाणे रायझोबियम कल्चर चोळल्यामुळे उत्पादनात हमखास १० - २०% पर्यंत वाढ झालेली दिसून आलेली आहे.

जाती
- बोनव्हिला : या जातीच्या शेंगा आकर्षक गर्द हिरव्या रंगाच्या असून शेंगातील दाणे अत्यंत गोड असतात. झाडांची उंची मध्यम असून ४५ दिवसांनी शेंगा काढणीस येतात.
- अरकेल : या जातीच्या शेंगा आकर्षक गर्द हिरव्या रंगाच्या असून साधारणपणे ६ ते ७ सेंमी लांबीच्या असतात. झाडांची उंची जवळपास ४० सेंमी असून शेंगा लागवडीनंतर ५० ते ५५ दिवसांनी काढणीस तयार होतात.
- मिटीओरः या जातीच्या शेंगा गर्द हिरव्या रंगाच्या असून सर्वसाधारणपणे ७ ते ८ सेंमी लांबीच्या असतात. झाडांची उंची जवळपास ४० सेंमी असून शेंगा लागवडीनंतर ५० ते ६० दिवसांनी काढणीस तयार होतात.
- जवाहर १ : या जातीच्या शेंगा फिकट हिरव्या रंगाच्या असून सर्वसाधारणपणे ६ सेंमीपर्यंत लांब असतात. लागवडीपासून ५५ दिवसांत फुलावर येते व ९० दिवसांत शेंगा काढणीस सुरुवात होते. याशिवाय अर्ली ब्यागर, परफेक्शन न्यू लाईन, असौजी, जवाहर - ४, व्ही.एल. ३, बी. एच. १, के.एल. १३६, बुंदेलखंड आणि वाई इत्यादी जाती प्रसिद्ध आहेत.

लागवड
सपाट वाफ्यात किंवा सरी वरंब्यावर ६० सेंमी अंतरावर करतात. सऱ्यांमध्ये दोन्ही बाजूस बी टोकून लावले जाते. लागवड करताना बियाणे २.५ ते ३.० सेंमी खोलीवर पेरावे आणि जमिनीत पुरेशी ओल असताना लागवड करावी. टोकन पद्धतीने बी लावल्यास हेक्टरी २५-३० किलो बी लागते व पेरणी साठी हेक्टरी ७०-७५ किलो बियाणे लागते.

खत व्यवस्थापन
पिकास जमिनीचा मगदूर पाहुनच खताची शिफारस केली जाते. त्यासाठी माती परीक्षण करावे. सर्वसाधारणपणे हेक्टरी १५ ते २० टन शेणखत २०:६०:६० किलो नत्र, स्फुरद आणि पालाश देणे जरुरीचे आहे. जमिनीची मशागत करीत असताना संपूर्ण शेणखत जमिनीत पसरून मिसळणे.

पाणी व्यवस्थापन
पेरणी झाल्यानंतर हलक्या जमिनीत पाणी लगेच द्यावे. परंतु सतत पाणी देणे टाळावे. शेंगा भरताना नियमित पाणी द्यावे. हिवाळ्यात सरीने पाणी द्यावे. इतर वेळेस भीज पाणी न देता ठिबकने पाणी द्यावे (हलके पाणी द्यावे). सपाट वाफ्यावर वाटाणा केल्यास थंडीत दुपारच्या वेळी पाणी द्यावे. पहाटेचे पाणी देऊ नये.

प्रा. वैभव प्रकाश गिरी
(सहायक प्राध्यापक), कृषि किटकशास्त्र विभाग, रामकृष्ण बजाज कृषि महाविद्यालय, पिपरी-वर्धा

Web Title: Management of pea cultivation during rabi season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.