सध्या पालघर जिल्हा आणि राज्याच्या इतर जिल्ह्यात भात पीक फुलोऱ्यात स्थितीत असून राईस गंदी बग नावाची कीड दिसून येत आहे, म्हणून या किडीबद्दल अधिक माहिती शेतकऱ्यांना उपयोगी राहील यादृष्टीने माहिती देण्याचा छोटा प्रयत्न.
किडीची ओळख
हिरव्या तपकिरी रंगाची १८ ते २० मिमी (२ सेमी) लांब, पंख असलेली (जसा छोटा नाकतोडा काही लोक म्हणतात) अशी ही कीड भाताच्या लोंब्या वर दिसत आहे. याची पिले पंख नसलेली आणि लांबीला १२ ते १६ मिमी, हिरव्या रंगाची आहेत.
ही कीड भाताच्या पानाच्या वरच्या दिशेला एका सरळ रेषेत लाल, तपकिरी रंगाची अंडी घालतात. ही अंडी पानावर चिकटलेली असतात. (२५ ते ३५ अंडी).
एक महिन्यात एक पिढी पूर्ण करते म्हणजे भाताच्या हंगामात ५ पिढ्या पूर्ण होऊ शकतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात संख्या वाढते.
लक्षणे
शेताजवळून चालताना हे कीटक घाण वास सोडतात त्यामुळे या किडीला गंदी बग असे नाव पडले असावे.
नुकसान
भाताचे दाणे भरत असताना म्हणजेच दुधाळ अस्वस्थेत या किडींची संख्या जास्त वाढते आणि दुधाळ दाण्यात कीड डासा प्रमाणे सोंड खुपसून दाण्याच्या आतील दुधासारखा रस पिऊन घेते. दाण्याला छिद्र पडल्यामुळे त्यात बुरशी लागते. असे दाणे भरत नाहीत. मोठ्या प्रमाणात पळींज तयार होते. जवळपास ५० ते ७० टक्के उत्पादनात घट येऊन नुकसान होऊ शकते.
उपाययोजना
- बांधावरील गावात काढून बांध पूर्ण स्वच्छ ठेवा. यामुळे किडींची संख्या नियंत्रित ठेवायला मदत होईल.
- एकरी एक प्रकाश सापळा लावून त्यात अडकलेले प्रौढ नष्ट करा.
- नुकसान पातळी ओलांडली तर (एक चुडावर १ कीटक) रासायनिक कीटकनाशकांचा वापर करा.
- प्रथम निम तेल (१०,००० पिपिएम) ३ मिली प्रती लिटर फवारणी करा.
- बिवेरिया बॅसीयाना हे जैविक कीटकनाशक १० मिली प्रती लिटर फवारावे.
- या दोन्हीने कीड आटोक्यात येत नसेल तरच रासायनिक कीटकनाशक वापरा. त्यासाठी मिथाईल पराथिऑन २% भुकटी किंवा मॅलॅथीयॉन भुकटी ५% किंवा क्लोरोपायरीफॉस भुकटी ५% यापैकी कोणतीही एक भुकटी एकरी ८ किलो धुराळवी किंवा फवारणीसाठी क्लोरो+सायपर मिश्रण २ मिली प्रती लिटर पाण्यातून संध्याकाळी फवारणी करावी.
प्रा. उत्तम सहाणे
कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हील, जि. पालघर