आंबिया बहारामध्ये विविध हवामान धोक्यामुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेमध्ये सहभागाकरीता विमा पोर्टल १ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू झाले असून कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत सहभागी होऊन फळबागांचे संरक्षण करा, असे आवाहन मुरुड तालुका कृषी अधिकारी मनीषा भुजबळ यांनी केले.
कोकण विभागामध्ये अधिसूचित केलेल्या महसूल मंडळात आंबा व काजू पिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना (आंबा, काजू-५ वर्षे) विमा संरक्षण देण्यात येईल.
कर्जदार शेतकरी व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असेल. खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही योजना लागू राहाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
किती क्षेत्रासाठी नोंदणी?१) एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकांसाठी ४ हेक्टर क्षेत्रावर विमा नोंदणी करता येईल.२) कमीत कमी क्षेत्र ०.१० हेक्टर असावे.३) विमा अर्ज सोबत ७/१२ फळपीक नोंद असलेला ८ अ, आधारकार्ड, पासबुक, फळपीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जिओ टॅग केलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य राहील.
ही योजना रायगड जिल्ह्यामध्ये युनिव्हर्सल सोम्पो कंपनी लि; मार्फत राबविण्यात येत आहे. फळपीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत आंबा पिकाकरीता दि. ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत आहे.
कुणाला फायदा?अवेळी पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट यांच्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. आंबा फळपिकासाठी जास्त तापमान, कमी तापमान, अवेळी पाऊस व वेगाचा वारा या हवामान घटकांमुळे झालेल्या नुकसानीसाठी विमा संरक्षित आहे. तर गारपीटमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी स्वतंत्र विमा हप्ता भरणे आवश्यक आहे.
संपर्कशेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.