जिल्ह्यातील फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना २०२२-२३ यावर्षी आंब्याच्या नुकसानीचा फटका बसला होता. त्यास अनुसरून या नुकसानग्रस्त ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता फळपीक विमा योजनेअंतर्गत या आंबा पिकाकरिता २२ कोटी ६२ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या आंबा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक चणचण दूर झाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नेहमीच नुकसान होते. हाती आलेले उत्पादन वाया जात असल्याने शेतकऱ्यांना नेहमीच चिंता सतावते, पण आता विमा योजनेमुळे उत्पादकांना नुकसान भरपाई मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
अधिक वाचा: आंबा फळ पिकातील मोहोराचे संरक्षण कसे कराल?
सहा लाखांचा हप्ता• जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबा फळपिकासाठी २०२२-२३ मध्ये एकूण चार हजार ६६१ शेतकऱ्यांनी एकूण सहा कोटी सहा लाख रुपये पीकविमा हप्ता भरून या आंब्याचा विमा काढला होता. यामध्ये जिल्ह्यातील दोन हजार ७९१ हेक्टरवरील आंबा फळपिकाचे क्षेत्र संरक्षित झाले होते.• या फळपीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांपैकी जिल्ह्यातील चार हजार ४६८ शेतकऱ्यांना २२ कोटी ६२ लाख रुपयांच्या नुकसानभरपाई रकमेचे वाटप एचडीएफसी अंगों जनरल इन्श्युरन्स कंपनीकडून करण्यात आले आहे, असे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी 'लोकमत'ला सांगितले.
तालुका | सहभागी शेतकरी | भरपाईप्राप्त शेतकरी | भरपाई (कोटी रु.) |
अंबरनाथ | १११ | १०८ | ०.४७ |
भिवंडी | १५० | १४० | ०.५१ |
कल्याण | ४३३ | ३६३ | १.३१ |
शहापूर | ११५३ | १११२ | ५.२० |
मुरबाड | २८१४ | २७४५ | १५.१२ |
या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्राप्त झालेल्या नुकसानभरपाईचा विचार करता विमा हप्ता रकमेच्या जवळजवळ चारपट नुकसानभरपाईची रक्कम या आंबा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यंदा मिळाली आहे. तालुकानिहाय पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबा फळपिकाच्या २०२२-२३ मधील नुकसानीसाठी दिली आहे. जिल्ह्यातील या चार हजार ६६१ शेतकऱ्यांना मिळालेल्या या नुकसानभरपाई रकमेप्रमाणेच उर्वरित १९३ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई रक्कम लवकरच देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचेही कुटे यांनी स्पष्ट केले.