तळा : कोकणातील आंबा उत्पादकांच्या मागणीला यश आले असून, आंबा विम्याचा भुर्दंड कमी करण्यात आला आहे. प्रतिहेक्टर २९ हजार इतका विम्याचा हप्ता होता. तो कमी करण्यात आला असून, आता १४ हजार ४५० इतका करण्यात आला आहे.
तळा तालुक्यातील शेतकरी संघटनेने गेल्या वर्षी आंबा पीक विमा परतावा व पीक विमा हप्ता कमी व्हावा, यासाठी मंत्रालयात कृषिमंत्री धनंजय मुंडे, खा. सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे यांच्या समवेत बैठक घेतली होती.
त्यावेळी रायगडमधील शेतकरी बांधवांना आंबापीक विमा हप्ता हा इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त असल्याची खंत व्यक्त करीत तो कमी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार यंदा विम्याचा हप्ता कमी करण्यात आला आहे.
कोकण विभागातील भौगोलिक परिस्थिती व गुंठ्यांमध्ये विभागली गेलेली शेती लक्षात घेऊन इतर विभागांच्या तुलनेत कोकणातील शेतकऱ्यांसाठी सदरची योजना किमान दहा गुंठ्यांमध्ये राबवण्याची संधी देण्यात आली आहे.
असा हप्ता असे संरक्षण
मागील वर्षी आंबा पिकासाठी प्रतिहेक्टर २९,००० हजार रुपये विमा हप्ता भरावा लागत होता. आता मात्र प्रतिहेक्टर १४ हजार ४५० रुपये एवढाच हप्ता भरावा लागणार आहे. सदरच्या विम्यानुसार आंब्यासाठी संरक्षित रक्कम १ लाख ७० हजार, तर काजू पिकासाठी १ लाख २० हजार एवढी रक्कम प्राप्त होणार आहे.
उत्पादकांना दिलासा
आंब्याच्या विमा हप्त्यामध्ये ५० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळाला आहे, याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली आहे.
अधिक वाचा: Kharif Pikvima यंदाच्या खरीपसाठीही मिळणार एक रुपयात पिक विमा