रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४३२५.९० मिलिमीटर पाऊस पडला असून, यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त आहे. जिल्ह्यात दि. २८ ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे जमिनीत अद्याप ओलावा टिकून आहे.
ओलाव्यामुळे आंब्याच्या झाडाला पालवी मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहराची प्रक्रिया उशिराने सुरू होऊन आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात एकूण ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत पडलेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा कायम आहे. ऑक्टोबर महिन्यात उष्म्यामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होतो.
नोव्हेंबरपासून थंडी सुरू झाल्यावर मुळांना ताण बसून मोहराची प्रक्रिया सुरू होते. परंतु, दिवाळी सुरू झाली तरी अद्याप थंडी जाणवू लागलेली नाही. जमिनीतील ओलाव्यामुळे कलमांना पालवी सुरू झाली आहे.
जुनी पानगळ होऊन नवीन पाने येत आहेत. पालवी जीर्ण होण्यासाठी किमान दीड ते दोन महिने लागतात. त्यानंतर मोहर प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. मोहर प्रक्रियेनंतर खऱ्या अर्थाने आंबा हंगामाला सुरुवात होणार आहे.
गेली दोन वर्षे ऑक्टोबर हीटचे प्रमाण चांगले राहिल्याने नोव्हेंबरमध्ये पहिल्या टप्प्यात मोहर आला होता. मात्र, डिसेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे पहिल्या टप्प्यात मोहर खराब झाला होता.
परंतु, यावर्षी नोव्हेंबर सुरू झाला तरी थंडी सुरू झालेली नाही. धुके मात्र पडत आहे. त्यामुळे मोहर प्रक्रिया सुरू होण्यासाठी जानेवारी उजाडण्याची शक्यता आहे.
पहिल्या टप्प्यातील आंबा मार्च/एप्रिलमध्येचनोव्हेंबरमध्ये मोहर आल्यास फेब्रुवारीपर्यंत पहिल्या टप्प्यातील आंबा बाजारात येण्याची शक्यता असते. परंतु, मोहरच उशिरा आल्यास पहिल्या टप्प्यातील आंबा मार्च/एप्रिल महिन्यामध्येच येण्याची शक्यता आहे.
हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर होत असून, उत्पादन खालावत आहे. यावर्षीही हंगाम लांबण्याची शक्यता आहे. निसर्गातील बदलाची नोंद विमा कंपन्या घेत नसल्यामुळे बागायतदारांचे नुकसान होत आहे. - राजन कदम, बागायतदार