Lokmat Agro >शेतशिवार > Marathawada Rain Update : मराठवाड्यात अतिवृष्टी शिवार जलमय; सलग दुसऱ्या दिवशीही जोर कायम

Marathawada Rain Update : मराठवाड्यात अतिवृष्टी शिवार जलमय; सलग दुसऱ्या दिवशीही जोर कायम

Marathawada Rain Update: Heavy rain in Marathwada; The emphasis continued for the second day in a row | Marathawada Rain Update : मराठवाड्यात अतिवृष्टी शिवार जलमय; सलग दुसऱ्या दिवशीही जोर कायम

Marathawada Rain Update : मराठवाड्यात अतिवृष्टी शिवार जलमय; सलग दुसऱ्या दिवशीही जोर कायम

मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांत सलग दुसऱ्या दिवशी अनेक तालुक्यांत मुसळधार पाऊस बरसला. वाचा सविस्तर (Marathawada Rain Update)

मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांत सलग दुसऱ्या दिवशी अनेक तालुक्यांत मुसळधार पाऊस बरसला. वाचा सविस्तर (Marathawada Rain Update)

शेअर :

Join us
Join usNext

छत्रपती संभाजीनगर :  

मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी पावसाचा जोर दिसून आला. आठही जिल्ह्यांत सलग दुसऱ्या दिवशी अनेक तालुक्यांत मुसळधार पाऊस बरसला. पावसामुळे प्रामुख्याने कापसाचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मराठवाड्यात दोन दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. बुधवारी सकाळपर्यंत विभागात १३.८ मिमी पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यातील दोन, तर जालना व लातूर जिल्ह्यांतील एका मंडळात अतिवृष्टी झाली. पावसामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला.

जिल्हा   पाऊस (मिमी)

छ. संभाजीनगर

११.६
जालना  १७.७
बीड१२.३
लातूर        २०.५
धाराशिव    ३७.६
नांदेड   ६.५ 
परभणी  १७.३
 हिंगोली७.३

चार जणांचा मृत्यू

कन्नड तालुक्यातील विठ्ठलपूर शिवारात शिवना नदीपात्रात बुडून रवी लक्ष्मण सोनवणे (२५, रा. विठ्ठलपूर) याचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यात दोन, तर जालन्यात एका व्यक्तींचा मृत्यू झाला.

चार मंडळांत जोरदार पाऊस

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील डटयूकूर मंडळात २०५.५० मिमी, गोविंदपूर मंडळात ६८.२५ मिमी, जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी मंडळात ७८.२५, तर लातूर जिल्ह्यातील मुरुड मंडळात १०१.२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १७ लहान-मोठी जनावरे दोन दिवसांत दगावली. 

जायकवाडीचे १८ दरवाजे दुसऱ्यांदा उघडले; १९,९१२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग

पैठण : येथील जायकवाडी धरणात ४ हजार १६९ क्युसेकने पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ९९.७८ टक्क्यांवर गेल्याने मंगळवारी मध्यरात्री धरणाचे १८ दरवाजे उघडून १९ हजार ९१२ क्युसेकने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली.

जायकवाडी धरणात २३ सप्टेंबर रोजी ९९.५६ टक्के पाणीसाठा होता. अशात जायकवाडी धरण पाणलोट क्षेत्रासह वरच्या धरणाच्या परिसरात चांगला पाऊस होत असल्याने पाण्याची आवक वाढल्याने मंगळवारी मध्यरात्री धरणाचे १८ दरवाजे उघडण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला.

मध्यरात्री गेट क्रमांक १०, २७, १८, १९ हे चार दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले, तर १६, २१, १४, २३, १२, २७, ११, २६, १३, २४, १५, २२, १७, २० असे बारा दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले. यातून गोदावरी नदीपात्रात ११ हजार ५२८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.

त्यानंतर सायंकाळी हा विसर्ग १४ हजार ६७२ क्युसेक करण्यात आला. तसेच उजव्या कालव्यातून ५०० क्युसेकने पाणी माजलगावसाठी सुरू आहे. याच महिन्यात ९ ते १३ सप्टेंबर या कालावधील धरणाचे १८ दरवाजे उघडून गोदापात्रात २.३९ टीएमसी पाणी विसर्ग करण्यात आला होता.

मांजरा धरण काठोकाठ, २ दरवाजे  उघडले

 लातूर: मांजरा प्रकल्प क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून मोठा पाऊस होत असल्यामुळे धरण काठोकाठ भरले आहे. पाण्याचा येवा लक्षात घेता, बुधवारी (२५ सप्टेंबर) रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास प्रकल्पाचे दोन दरवाजे ०.२५ मीटरने उघडले आहेत. यातून १ हजार ७३० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. 

पाणलोट क्षेत्रात होत असलेला पाऊस आणि धरणातील पाण्याची आवक लक्षात घेता, आणखी कमी अथवा जास्त विसर्ग करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. यामुळे मांजरा नदीला पूर आला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूरस्थिती लक्षात घेता, नदीपात्रात कोणीही उतरू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनच्या वतीने करण्यात आले आहे.

चार अभियंत्यांची देखरेख

मांजरा प्रकल्पाचा दरवाजा क्र. १ आणि ६ हे ०.२५ मीटरने उघडल्यामुळे नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. धरणावर पाटबंधारे विभागाच्या चार अभियंत्यांची देखरेख आहे, अशी माहिती शाखा अधिकारी सूरज निकम यांनी दिली.

हिंगोलीत जोरदार, मुरुडमध्ये ढगफुटीसृदश पाऊस

• हिंगोली : जिल्ह्यात सर्वदूर जोराचा पाऊस पडत आहे. २४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात दुपारी व रात्रीच्या वेळी पावसाने हिंगोली शहर व परिरसरातील डिग्रस कन्हाळे, सेनगाव तालुक्यातील सचना, गोरेगाव व इतर ठिकाणी जोरदारपणे हजेरी लावली, २५ सप्टेंबर रोजी वारंगाफाटा, डोंगरकडा, हिंगोली शहर परिसरातील डिग्रस कन्हाळे, सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव, कडोळी आदी गावांत पावसाने जोरदार अशी हजेरी लावली.

• लातूर : तालुक्यातील मुरुड परिसरात मंगळवारी दुपारी चार ते रात्री आठ या चार तासांत १०९ मिमी पाऊस झाला असून, अनेक घरांत पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. तसेच शेतशिवारांत पाणी साचल्याने सोयाबीन पिकास फटका बसला आहे. दरम्यान, गावातील ३०० नागरिकांचे तात्पुरते मंदिरात स्थलांतर करण्यात आले होते. शहरासह औसा, मुरुड आणि उदगीरमध्ये मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस झाला.

'सिद्धेश्वर' ही तुडुंब; पूर्णा नदीपात्रात विसर्ग ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाचे दरवाजे तिसऱ्यांदा उघडण्यात आले असून, बुधवारी धरणाचे चार दरवाजे उघडून तीन हजार २९० क्युसेक पाणी पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
सिद्धेश्वर धरण मागील महिनाभरापासून शंभर टक्के भरले आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे २५ सप्टेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे उघडून तीन हजार २९० क्युसेक, तर सांडव्यावरून एक हजार सहाशे क्युसेक असे एकूण चार हजार ९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला. धरणात पाण्याची आवक वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता उपविभागीय अभियंता सय्यद खालिद यांनी दिली. धरण प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सलग तिसऱ्या दिवशी बीड, जालन्यात पाऊस

जालना : हवामान विभागाकडून जिल्ह्यात गुरुवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील विविध तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. बुधवारी दुपारीदेखील जोरदार पावसाने जालना शहराला झोडपून काढल्यामुळे शहरातील वाहतूक मंदावली होती. तसेच अंबड, मंठा, जाफराबाद, भोकरदन तालुक्यांत जोरदार पाऊस बरसला.

बीड : शहरासह तालुका परिसरात बुधवारी, सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जवळपास अर्धा तास पाऊस झाल्याने बीड शहरात पाणीच पाणी झाले असल्याचे पाहावयास मिळाले. तसेच परळी, अंबाजोगाई, गेवराई तालुक्यातील जातेगाव, शिरूर, पाटोदा व अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे सकाळी पाऊस झाला. पावसामुळे शेतामध्ये पाणीच पाणी झाले आहे.

इसापूर धरणातून यावर्षी दुसऱ्यांदा पाण्याचा विसर्ग

कळमनुरी (जि. हिंगोली) : इसापूर धरण परिसरामध्ये व पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे धरणाची पाणीपातळी वाढतच चालली आहे. परिणामी, पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता इसापूर धरणाचे ३ दरवाजे १० सेंटिमीटरने उघडण्यात आले आहेत.

या अगोदर २२ सप्टेंबर रोजी तीन दरवाजे उघडण्यात आले होते. यावर्षीच्या पावसाळ्यात आतापर्यंत इसापूर धरणातून दहा ते १० ते ११ वेळा पाणी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत पैनगंगा नदीपात्रात २९.३०१ क्युमेक इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे व कमी करण्याबाबतचा निर्णय धरण पूरनियंत्रण कक्ष करणार आहे. धरणातून पाणी सोडल्यामुळे पैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

उपयुक्त जलसाठा ९६१.२३ दलघमी

• सध्या इसापूर धरणाची पाणीपातळी ४४०.९७ मीटर आहे. तर धरणात उपयुक्त जलसाठा ९६१.२३ दलघमी आहे. इसापूर धरण परिसरात आतापर्यंत १०४३ दलघमी पाऊस पडला आहे.

• सध्या पेनटाकळी, साखरखेर्डा, मेहकर, डोणगाव, रिसोड, गोवर्धन, शिरपूर, गोरेगाव, कनेरगाव नाका, अनसिंग, सिरसम, खंडाळा, इसापूर या धरण परिसरात व पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे.

Web Title: Marathawada Rain Update: Heavy rain in Marathwada; The emphasis continued for the second day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.