जालना : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील संचालक विस्तार शिक्षण डॉ. जी. एम. वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विज्ञान केंद्र बदनापूर येथे शुक्रवार (दि.१७) रोजी वैज्ञानिक सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदरील बैठकीत केव्हीके बदनापूरद्वारे आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि वर्ष २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या विविध शैक्षणिक, संशोधन आणि विस्तार उपक्रमाचा सविस्तर आढावा केव्हीके बदनापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. एस. डी. सोमवंशी यांनी मांडला. तसेच आगामी वर्ष २०२५-२६ करिता कृषी विकासाच्या दृष्टीने आणि शेतकर्यांच्या समस्येवर आधारित नवीन कृषी विस्तार कार्यक्रम हाती घेणे बाबत आढावा घेण्यात आला.
यावेळी समिती सदस्यांनी केंद्राच्या कार्याचे कौतुक करून भविष्यातील काळात अधिक प्रभावी कार्यक्षमता साध्य करण्यासाठी मौल्यवान सूचना व मार्गदर्शन प्रदान केले.
या बैठकीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी चे कुलगुरू डॉ. इंद्र मणी आणि अटारी पुणेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. शाकीर अली हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजीनगरचे सहयोगी संचालक संशोधन तथा कृषी विद्यावेता डॉ. एस. बी. पवार, मोसंबी संशोधन केंद्र बदनापूरचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील आणि कृषी संशोधन केंद्र बदनापूरचे प्रभारी अधिकारी डॉ. के टी जाधव यांची वैज्ञानिक अधिकारी म्हणून विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरवातीला केव्हीके बदनापूर द्वारे नैसर्गिक शेती, मातीचा नमुना कसा घ्यावा आणि कापूस पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर प्रकाशित घडीपत्रिका आणि हस्तपत्रिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. जी. एम. वाघमारे यांनी अध्यक्षीय भाषणात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे नेहमीच शेतकऱ्याप्रती नवनवीन वाण आणि तंत्रज्ञान देण्याकरिता कटीबद्ध असल्याचे सांगितले. शिवाय शेतकऱ्यांच्या मुख्य समस्यांचा अभ्यासाअंतीच प्रक्षेत्र चाचणी, आध्यरेषीय प्रात्येक्षिक आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन करण्यात यावे असे सूचित केले. तर शेतकऱ्यांनी हवामान अनुकूल आणि शिफारशीत तंत्रज्ञानाचा शास्त्रोक्त पद्धतीने अवलंब करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी कृषी विभागाच्या वतीने उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत पवार, कृविकें बदनापूरच्या कार्यक्षेत्रातील बदनापूर, अंबड आणि जाफराबाद तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी गोपालदास गुजर, बाळासाहेब गंडे, अमोल शिंदे, वैज्ञानिक सल्लागार समितीचे सदस्य तथा शेतकरी प्रतिनिधी संजय मोरे पाटील, सुभाषराव बोडखे, महिला उद्योजिका संजीवनीताई जाधव, रुपाली निकम आदींची उपस्थिती होती. तसेच अजय मोहिते, सुनंदा पाटील, कैलास तावडे, रघुनाथ पंडित, विद्यार्थी प्रतिनिधी तसेच वैज्ञानिक सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. आर. एल कदम यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. एस. आर. धांडगे यांनी केले. सदरील वैज्ञानिक सल्लागार समिती बैठकी करिता माविम जालना, आत्मा विभाग जालना, जिल्हा बँक, शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीने कृषी विज्ञान केंद्र बदनापूरच्या कार्याला नवीन दिशा प्रदान करण्यास मदत करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करतांना 'अशी' घ्या काळजी; अबाधित आरोग्यासह टळेल आर्थिक हानी