राज्यात जवळपास तीन आठवडे पावसाने ओढ दिल्यानंतर आता मराठवाडा, विदर्भ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याचे चित्र आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी मराठवाड्यातील धरणांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.
मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील उपयुक्त पाण्यासाठी आता 33.97 टक्क्यांवर येऊन थांबला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना तसेच सामान्य नागरिकांवर पाणीटंचाईचे संकट उडवण्याची भीती आहे.
येलदरी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 59.91 टक्क्यांवर पोहोचला असून माजलगाव 14.29%, पैनगंगा 65.3 टक्के, तेरणा 28.47%, मांजरा 25.48%, दुधना 26.76% एवढे भरले आहे.
पुणे विभागातील बहुतांश धरणांमध्ये चांगला पाणीसाठा असून चाकसमान धरण 99.29% भरले आहे. पावसाचा जोर वाढल्याने पानशेत धरण 100 टक्के भरले असून खडकवासला 63.60%, भाटघर 88.6%, मुळशी 87.34%, तर पवना 97.87% भरले आहे.
रब्बी आणि उन्हाळी हंगामात केली जाणारी शेती ही सिंचन व्यवस्थेवर आधारित असल्याने धरणातील पाणीसाठा किती आहे यावर रब्बी पिकाचा हंगाम अवलंबून असणार आहे. राज्यातील वापरायोग्य उपलब्ध पाण्यापैकी साधारणत: ८५ टक्के पाणी सिंचनासाठी तर, उर्वरित पाणी बिगर सिंचनासाठी म्हणजे पिण्यासाठी, उद्योगासाठी वापरले जाते.