पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीत गुरुवारी राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्याची जी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली तीत सर्वाधिक लाभ हा मराठवाडा आणि विदर्भाला मिळाला. कोकणातील जिल्ह्यांना सर्वांत कमी लाभ मिळाला. मराठवाड्यात सर्वाधिक निधी बीडला मिळाला..
जिल्हावार वाटपाची आकडेवारी बघता अहमदनगर (१०३.५२ कोटी) अव्वलस्थानी आहे. सर्वात तळाला ठाणे (१३.६७ कोटी) जिल्हा आहे. अहमदनगरमधील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे ५ लाख १७ हजार ६११, तर सर्वांत कमी ठाणे जिल्ह्यातील ६८ हजार ३६७ आहे. चार लाखांवर लाभार्थी असलेल्या जिल्ह्यांमध्ये सोलापूर (४५४०४०) आणि कोल्हापूरचा (४०६२४० ) समावेश आहे.
तीन लाखांवर शेतकरी लाभार्थी संख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलडाणा, जळगाव, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा यांचा समावेश आहे. एक लाखापेक्षा कमी लाभार्थी शेतकरी असलेल्या जिल्ह्यांमध्ये नंदुरबार, पालघर, रायगड, ठाणे यांचा समावेश आहे. राज्यातील एकूण लाभार्थींची संख्या ८५ लाख ६००८२ इतकी आहे.
जिल्हावार मिळालेला निधी (आकडे कोटी रुपयांत)
अहमदनगर १०३.५२, अकोला ३७.५६, अमरावती ५३.१८, छत्रपती संभाजीनगर ६५.३७, बीड ७७,९१, भंडारा ३७.२१, बुलडाणा ६६.३८, चंद्रपूर ४३.३२, धुळे २८.४९, गडचिरोली २५.९३, गोंदिया ४२.४८ हिंगोली ३६.१२. जळगाव ७५.९१, जालना ५७.९५, कोल्हापूर ८१.२५, लातूर ५३.४६, नागपूर ३०.०८, नांदेड ७५.४८, नंदुरबार २९.३२, नाशिक ७७.०७, धाराशिव ४२.२८ पालघर १६.०७, परभणी ५३.४२, पुणे ७७.९७, रायगड १९.६५. रत्नागिरी २५.५२, सांगली ७७,४४, सातारा ७८.६७, सिंधुदुर्ग २१.६२, सोलापूर ९०.८१, ठाणे १३.६७, वर्धा २४.६८, वाशिम ३०.८१, यवतमाळ ५५.४३.