Join us

Market committee : दिवाळी सुट्टी जाहीर : बाजार समित्यांमधील शेतमाल लिलाव राहणार आठवडाभर बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 3:52 PM

वाशिम जिल्ह्यातील वाशिम आणि रिसोड बाजार समितीची दिवाळी सुट्टी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. (Market committee)

 Market committee :

वाशिम : दिवाळीच्या सणामुळे राज्यातील बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदीचे व्यवहार बंद असतात. याबाबत पणन संचालनालयाचे तसे आदेशही आहेत. अशातच वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि वाशिम बाजार समित्या २८ ऑक्टोबरपासून बंद राहणार आहेत.

वाशिम बाजार समितीचे व्यवहार २ नोव्हेंबरपासून पूर्ववत होतील, तर रिसोड बाजार समितीचे व्यवहार मात्र पुढील आदेशापर्यंतच बंद राहणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजे पुढील किमान आठवडाभर या बाजार समित्यांमध्ये व्यवहारच होणार नाहीत.

यंदा दिवाळीच्या सणानिमित्त बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदीचे व्यवहार ३० ऑक्टोबरपर्यंत सुरू राहण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती; परंतु वाशिम आणि रिसोड बाजार समितीमधील शेतमाल खरेदीचे व्यवहार २८ ऑक्टोबरपासूनच बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिवाळीमुळे शेतकरी माल बाजारात आणत होते. अशातच बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदीचे व्यवहार एवढ्यात बंद ठेवले जाण्याची अपेक्षाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नव्हती, मात्र शनिवारी रिसोड आणि वाशिम बाजार समितीच्या वतीने या संदर्भातील सूचना जाहीर करण्यात आली.

त्यामध्ये २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरपर्यंत वाशिम बाजार समितीमधील, तर रिसोड बाजारा समितीकडून जाहीर केलेल्या सूचनेनुसार या बाजार समितीमधील व्यवहार २९ ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले.

इतर बाजार समित्यांच्या निर्णयाकडे लक्ष

वाशिम जिल्ह्यातील वाशिम आणि रिसोड बाजार समिती २८ ऑक्टोबरपासून बंद राहणार असली तरी सोयाबीनच्या दृष्टीने महत्वाची मानली जाणारी कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती ही सोमवारपासून बंद राहणार आहे की नाही. त्याबाबतचा निर्णय स्पष्ट झाला नाही.शिवाय इतरही काही बाजार समितीच्या निर्णयाचीही माहिती नाही. या बाजार समित्यांच्या निर्णयाकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष असणार आहे.

दिवाळीच्या तोंडावर माल कुठे विकावा?

ऐन दिवाळीचा सण तोंडावर असताना सोमवारपासून रिसोड आणि वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमाल खरेदीचे व्यवहार जवळपास आठवडाभर बंद राहणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर माल कुठे विक्री करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला असून, आता शेतकऱ्यांना कवडीमोल दराने खेड़ा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचाच पर्याय राहणार आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रबाजार समिती वाशिममार्केट यार्डशेतकरीशेती