Join us

Video : भर सभेतून निघून गेलेल्या सत्तारांवर सभापतींनी केले खळबळजनक आरोप! पणन संचालक, आर्थिक व्यवहार अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 6:52 PM

Market Yard Conference Abdull Sattar Pune : पणन मंत्री अब्दुल सत्तार कालच्या परिषदेतून निघून गेल्याने राज्यभरातील बाजार समित्यांच्या सभापतींनी त्यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.

Market Yard Conference Abdull Sattar Pune : राज्यभरातील बाजार समित्यांच्या परिषदेमधून पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी केवळ १० मिनिटांत काढता पाय घेतल्यामुळे राज्यभरातील बाजार समित्यांच्या सभापतींनी संताप व्यक्त केला आहे. तर अब्दुल सत्तार यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. या आरोपामुळे सरकारला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

बाजार समित्यांचे प्रश्न आणि त्यावरील अडचणींवर मात करण्यासाठी पणन मंडळ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी संघाच्या वतीने राज्यभरातील बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद आयोजित केली होती. या परिषदेला सर्व बाजार समित्यांचे सभापती, सचिव उपस्थित राहून पणन मंत्र्यांसमोर बाजार समित्यांचे प्रश्न मांडणार होते. त्यानंतर या प्रश्नांवर चर्चा होणार होती पण प्रत्यक्ष असे काहीच घडले नाही. कार्यक्रमाला अडीच तास उशिरा पोहोचलेल्या सत्तारांनी केवळ १० मिनिटांच्या आत काढता पाय घेतल्याने सभागृहात गोंधळ झाला. अब्दुल सत्तार हाय हाय, पन्नास खोके - एकदम ओके अशा घोषणा उपस्थितांनी दिल्या.

"राज्यातील बाजार समित्यांचे अनेक विषय १९८८ पासून प्रलंबित आहे. हे प्रश्न सर्वांना समजले पाहिजेत यासाठी परिषद आयोजित करण्याची मागणी आम्ही सरकारकडे केली होती. १२-१ च्या परवानगीसाठी जे प्रस्ताव पणन संचालकाकडे येतात त्यामध्ये मोठे आर्थिक व्यवहार होतो असे प्रतिनिधींचे म्हणणे होते. ते प्रतिनिधी पणनमंत्र्यांसमोर हा विषय बोलत असताना पणनमंत्री भर सभेतून निघून गेले." असं मत कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी संघाचे सभापती प्रविणकुमार नाहाटा यांनी व्यक्त केलं.

शासन ही आमची आई आहे, आमचं दुखणं ऐकून न घेता तुम्ही लाथा मारून निघून जाता ही गोष्ट चांगली नाही. यासंदर्भात सरकारने जातीने लक्ष घालावे अशी मागणी सभापतींनी केली. दरम्यान, आमच्या बाजार समितीचे ५ टक्के अंशदान पणन मंडळाला विनाकारण दिले जाते. ते कमी करावे आणि खासगी बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट होते आणि सहकारी बाजार समित्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे त्यांची परवानगी रद्द करावी किंवा सहकारी आणि खासगी बाजार समित्यांचे नियम सारखे करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

अध्यक्ष्यांनी अडचणींना तोंड द्यावे लागते, असे पळून जायचे नसते. एखाद्याने तुमच्यावर आरोप केले तर तुम्ही उत्तर देणे अपेक्षित होते. पण मी निघालो असं म्हणून तुम्ही निघून जाता हे वाईट आहे. जबाबदारी असणारा व्यक्ती सभागृह सोडून पळून जाताना मी याआधी कधीच पाहिला नाही.- प्रविणकुमार नहाटा (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी संघ, महाराष्ट्र राज्य)

टॅग्स :बाजारशेतकरीमार्केट यार्डशेती क्षेत्र