Market committee :
वाशिम : जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदीचे व्यवहार दिवाळीनिमित्त गुरुवार (३१ ऑक्टोबर) पासून बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे सणासुदीत पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकरी खेडा खरेदी अर्थात रस्त्यावर शेतमाल विकत घेणाऱ्या खरेदीदारांचा आधार घेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आता मात्र, आजपासून (४ नोव्हेंबर) रोजी बाजार समित्यांचे व्यवहार सुरळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीनची आवक वाढण्याचा अंदाज आहे.
दिवाळीच्या सणामध्ये राज्यातील बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदीचे व्यवहार बंद असतात. याबाबत पणन संचालनालयाचे तसे आदेशही आहेत.
अशातच वाशिम जिल्हाातील रिसोड आणि वाशिम बाजार समितीमधील शेतमाल खरेदीचे व्यवहार २८ ऑक्टोबरपासून बंद ठेवण्यात आले होते ४ नोव्हेंबरपासून पूर्ववत होणार असल्याचे सांगण्यात आले होते.
बाजार समितीमधील शेतमाल खरेदी शनिवारपर्यंत सुरू झाली नव्हती. रिसोड बाजार समितीचे व्यवहार मात्र पुढील आदेशापर्यंतच बंद राहणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते.
या बाजार समित्या बंद असल्यामुळे ऐन सणासुदीत पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी धडपड करणाऱ्या शेतकऱ्यांची पंचाईत झाली आणि त्यांना रस्त्यावर शेतमाल विकत घेणाऱ्या खरेदीदारांकडे अल्पदरात शेतमाल विकावा लागला. सोमवार (४ नोव्हेंबर) पासून काही बाजार समित्यांचे व्यवहार सुरळीत होणार आहे. रिसोड, कारंजा बाजार समिती या संदर्भात सुचनाही दिलेली आहे.
सोयाबीनला बाजारात कवडीमोल भाव
जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोमवार आणि मंगळवारी सोयाबीनची विक्रमी आवक पाहायला मिळाली. कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक ११ हजार क्विंटल झाली होती. तर या ठिकाणी सोयाबीनला किमान ३ हजार ८०० ते कमाल ४ हजार ३८५ रुपयेप्रती क्विंटलपर्यंतचा भाव मिळाला. आता त्यापेक्षाही कमी किमतीत सोयाबीनची विक्री करावी लागत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
शेतकऱ्यांना सोसावे लागले नुकसान
वाशिमसह इतर काही बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी सोमवारपासूनच बंद होते. त्यामुळे ऐन सणासुदीत आणि रब्बी हंगामाच्या तयारीत शेतकऱ्यांची पंचाईत झाली होती. अशात त्यांना रस्त्यावर खरेदी करणाऱ्यांकडे सोयाबीनची विक्री करावी लागली. या ठिकाणी खुपकमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानही सहन करावे लागले. सोमवार (४ नोव्हेंबर) पासून बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी सुरू होण्याची अपेक्षा आहे.