राज्यातील बाजार समित्यांचे आधुनिकीकरण करण्याच्या हेतूने त्यांचा विकास आराखडा तयार करणे. दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विविध विषयांवर चर्चा, शेतमालाच्या विपणनात अंगीकारावयाच्या आधुनिक बाबी, शेतकरी व इतर सर्व बाजार घटकांना द्यावयाच्या सोयीसुविधा, त्यात येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी (दि. २४) राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले आहे.
पणनमंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष जयकुमार रावल यांच्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती आदींसोबत सदरील परिषदेत चर्चा केली जाणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. तर पणनमंत्री रावल, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक, सचिव उपस्थित राहणार आहे.