रविंद्र शिऊरकर
या वर्षी खरीप व रब्बी हंगामातून खर्च न निघाल्याने तसेच हाती आलेल्या शेतमालाला अपेक्षित बाजारदर नसल्याने शेतकरी हवालदिन झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांवर अवलंबून असलेली ग्रामीण अर्थव्यवस्था काही अंशी ठप्प झाली आहे.
सततचा दुष्काळ तर कधी अवकाळीचा मारा यात जगाचा पोशिंदा नेहमीच भरडत आला आहे. या वर्षी तर सुरुवातीपासूनचा कोणताच हंगाम शेतकऱ्यांच्या अपेक्षेस उतरला नाही. ज्यामुळे आता ग्रामीण भागातील अर्थकारण जवळपास ठप्प झाले आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याचे दर सत्तरी पार गेले. मात्र दोन चार वर्षांपासून घरात ठेवलेला सोयाबीन विकायचा कधी ? शेती मालाचे बाजारभाव सुधारणार कधी ? असे शेतकऱ्यांचे कैक प्रश्न आजही प्रलंबित आहेत.
Goat Farming : शेळी पालनाचे प्रकार व त्यांची माहिती
अनेक शेतकऱ्यांच्या घरात आजही कापूस साठवलेला आहे. तर बाजारात नवीन गहू दाखल होत नाही तोच गव्हाचे बाजारदर ढासल्याने आता गहू उत्पादक शेतकरी देखील गहू साठवणूक करण्याच्या विचाराधीन आहे. तसेच अशातच आता पाणी टंचाई निर्माण झाल्याने, पशुधनासाठी चारा देखील पुरेसा नसल्याने आता शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
एकीकडे मुलांच्या शिक्षणांनासाठी दिवसेंदिवस वाढत चालणार शैक्षणिक खर्च, कुटुंबाचा आरोग्य खर्च, संसार आणि यातून सावरत अल्प बचत. असं सर्व करता करता शेतकरी कर्जबाजारी होतो आणि परिणामी आत्महत्येस बळी पडतो. - भावलाल डोंगरे, शेतकरी गांगपूर जि. छत्रपती संभाजीनगर