पवनानगर: मावळातील गुलाबांना विदेशात मोठी मागणी असून, 'व्हॅलेंटाइन डे'निमित्त यंदा सुमारे दोन कोटी फुलांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात झाली आहे.
स्थानिक बाजारपेठेतही ८० लाख गुलाब पोहोचले असून, यंदा दरही चांगला मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सुमारे ५०० ते ६०० एकरांवर फुलशेती होत आहे.
मुबलक पाणी असून, शेतकरी बंदिस्त फुलशेती करत आहेत. यामधून कमी खर्चात जास्त उत्पादन मिळत आहे. बंदिस्त फुलशेतीसाठी केंद्र सरकारकडून कर्जामध्ये सवलत मिळते.
'व्हॅलेंटाइन डे' निमित्त यंदा सुमारे दोन कोटी फुलांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात झाली आहे. स्थानिक बाजारपेठेतही ८० लाख गुलाब पोहोचले आहेत.
येथे जातो गुलाब
जपान, हॉलंड, थायलंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, जपान, दुबई, इथोओपिया या देशांतील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसह पुणे, मुंबई, दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद, बडोदा, जयपूर, लखनौ, जबलपूर, पाटणा, कोलकाता, भोपाळ, इंदूर, सुरत, हैदराबाद, गोवा या स्थानिक बाजारपेठेत सर्वाधिक मागणी आहे.
डच फ्लॉवर प्रजातीची जादा भुरळ; दर्जा आणि टिकाऊपणामुळे मागणी
'व्हॅलेंटाइन डे'ला मावळातील 'डच फ्लॉवर' प्रजातीतील लाल रंगाच्या टॉपसिक्रेट, बोरडेक्स, फॅशन, सामुराई, कप्परक्लास, श्रीनगला, फस्टरेड, पिवळ्या रंगाच्या गोल्डस्ट्राइक, गुलाबी रंगाच्या रिव्हायव्हल, पॉड्जन, ऑरेंज (नारंगी) रंगाच्या ट्रॉफिकल अमेजॉन, झाकिरा, पांढऱ्या रंगाच्या अविलॉस या फुलांना दर्जा व टिकाऊपणामुळे मागणी आहे.
४० ते ६० सेंटिमीटर फुलांना पसंती; बाजारात १७ ते १८ रुपये भाव
फुलांच्या दराची प्रतवारी लांबीनुसार ठरते. स्थानिक व जागतिक बाजारपेठेत ४० ते ६० सेंटीमीटरच्या फुलांना मोठी पसंती असते. यंदा प्रतवारीनुसार जागतिक बाजारपेठेत सध्या एका फुलाला १५ ते १६ रुपये, तर स्थानिक बाजारपेठेत १७ ते १८ रुपये भाव मिळाला आहे.
पिंपरी फूल मार्केटमध्ये 'व्हॅलेंटाइन डे'मुळे खरेदीदारांची झुंबड उडाली आहे. प्रेमाचे प्रतीक असलेल्या गुलाबाची प्रतिबंच २५०-३०० रुपयांपर्यंत आम्ही विक्री करत आहोत. ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीची फुले बाजारात आणल्यामुळे अपेक्षेप्रमाणे भाव मिळत आहे. - सोमनाथ ठाकर, व्यापारी, पिंपरी मार्केट
यावर्षी थंडी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर निर्यात करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी होती. मावळ तालुक्यातून सुमारे दोन कोर्टीच्या आसपास फुलांची विक्री करण्यात आली आहे. - मुकुंद ठाकर, संस्थापक, पवना फूल उत्पादक संघ
अधिक वाचा: Rose Farming Success Story: जगाच्या फुल मार्केटवर राज करतोय मावळचा गुलाब