Medicinal Plants: औषधी वनस्पतींच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी, शासनाकडून विविध योजना आणि उपक्रम राबवले जातात. या योजनेच्या मध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी तेल्हारा बाजार समितीने पुढाकार घेतला आहे.(Telhara Market Committee)
पारंपरिक शेतीपद्धतीला नवीन दिशा देण्यासाठी तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीने मुसळी, पानपिंपरी आणि सुगंधी वनस्पतींच्या (Medicinal Plants) प्रचारासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणे आणि माल खरेदी करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. (Telhara Market Committee)
औषधी वनस्पती म्हणून मुसळी, पानपिंपरी आणि सुगंधीकडे पाहिले जाते. या पिकांमधून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी शाश्वत उपाययोजना आखण्यात आल्या असून, त्यात बियाण्यांची उपलब्धता, मार्गदर्शन तसेच उत्पादित मालाच्या खरेदीची हमी दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल.
शेतकरी मेळाव्याचे आयोजन
जागतिक सहकार वर्षाचे औचित्य साधून २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता भागवत मंगल कार्यालय येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये शेतकऱ्यांना नवनवीन पीक पर्यायांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या हस्ते होईल. यावेळी उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे, बाजार समितीचे सभापती सुनील इंगळे, मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष रमेश हिंगणकर, वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, प्रा. सुधाकर येवले, मिलिंद इंगळे, कुलदीप तराळे, डॉ. जयराम कोरपे व प्रा. प्रदीप ढोले उपस्थित राहतील.
वैज्ञानिक मार्गदर्शन
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. नितीन पतके आणि डॉ. प्रकाश घाटोळ हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पारंपरिक व सुगंधी वनस्पर्तीच्या लागवडीतून अधिक उत्पन्न मिळवण्याचे तंत्र ते सविस्तर सांगणार आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत सकाळी ८ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी यामध्येही सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शाश्वत शेतीसाठी दिशा
शेतकऱ्यांचा आर्थिक विकास हाच आमचा उद्देश आहे. मुसळी, पानपिपरी आणि सुगंधी वनस्पतींची लागवड शाश्वत उत्पन्नाचा पर्याय ठरू शकते. यासाठी बाजार समिती बियाण्यांपासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देणार आहे. - सुनील इंगळे, सभापती