एमजीएम कृषी विज्ञान केंद्र व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने एमजीएम कृषि विज्ञान केंद्र, गांधेली येथे दि. १४/१२/२०२३ रोजी महिला शेतकऱ्यांसाठी फळे व भाजीपाला प्रक्रिया प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मिलेनियर फार्मर बळीराम सर्जेराव वाघ (मोसंबी उत्पादक) रा. धोंदलगाव ता. वैजापूर व सदाशिव गिते (रेशीम उद्योग) रा. देवगाव ता. पैठण या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी व्यासपीठावर गांधेली प्रक्षेत्राचे संचालक डॉ. के. ए. धापके तसेच देवगाव येथील जय जवान जय किसान शेतकरी गटाचे दीपक जोशी व पुरस्कार प्राप्त शेतकरी बळीराम वाघ, सदाशिव गिते, आत्माच्या आशा वर्गे व स्वाती जाधव यांची उपस्थिती होती. सत्काराला उत्तर देताना बळीराम वाघ म्हणाले की मोसंबी उत्पादन घेतानी मागील पाच वर्षापासून एमजीएम केव्हीके च्या संपर्कात होतो त्यामुळे उत्कृष्ट प्रतीच्या मोसंबीचे उत्पादन घेत आहे तसेच गावातील शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांची शेती प्रगत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
सदाशिव गीते यांनी सांगितले कि, जय जवान जय किसान गटाच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण, प्रदर्शन व शेती शास्त्रज्ञाच्या संपर्कामुळे रेशीम शेती करून लाखोचे उत्पन्न होत असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला आहे. त्यामुळे ज्यांना शेतीत प्रगती करावयाची आहे त्यांनी कृषि विज्ञान केंद्राच्या प्रशिक्षणाचा लाभ घेतला पाहिजे. दीपक जोशी म्हणाले की माती समृद्ध असेल तर शेती समृद्ध होऊ शकते.
एमजीएम गांधेली प्रक्षेत्राचे संचालक के. ए. धापके यांनी अध्यक्षीय समारोप करतांना सांगितले की कृषी विज्ञान केंद्राच्या कृषि प्रक्रिया प्रयोगशाळेत महिला गटांनी आपले पदार्थ तयार करण्यासाठी आमचे सहकार्य राहील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एमजीएम केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख काकासाहेब सुकासे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन व आभार डॉ. वैशाली देशमुख यांनी केले. या कार्यक्रमानंतर छत्रपती संभाजीनगर व पैठण तालुक्यातील महिला व शेतकरी यांना कृषी अन्नप्रक्रिया प्रकल्पात मोसंबी रस तयार करण्याचे प्रशिक्षण डॉ. वैशाली देशमुख यांनी प्रात्यक्षिकासह दिले त्यानंतर प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते.