Join us

Mhaisal Irrigation Project : सुधारित म्हैसाळ प्रकल्पाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात.. वाचा सविस्तर कसं केलंय नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 2:07 PM

जत पूर्व भागातील ६५ गावांसाठीची सुधारित म्हैसाळ योजनेतून कुठेही ओढे, नाल्यांना पाणी सोडणार नाही. बंद पाइपमधून थेट शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी दिले जाणार आहे.

अशोक डोंबाळेसांगली: जत पूर्व भागातील ६५ गावांसाठीची सुधारित म्हैसाळ योजनेतून कुठेही ओढे, नाल्यांना पाणी सोडणार नाही. बंद पाइपमधून थेट शेतकऱ्यांच्या शेतीलापाणी दिले जाणार आहे.

एकूण तीन टप्प्यांपैकी पहिल्या टप्याचे ५८ किलोमीटरपैकी २९ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत योजनेच्या कामावर ३३३ कोटी १५ लाख रुपयांचा खर्च झाला आहे.

म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा जत तालुक्यातील १२५ पैकी ७७ गावांना लाभ मिळत आहे. मात्र, पूर्णता वंचित ४८ गावे आणि मूळ योजनेतून अंशतः वंचित १७ अशा एकूण ६५ गावांना पाणी देण्यासाठी राज्य शासनाने विस्तारित म्हैसाळ योजनेला मंजुरी दिली आहे.

सुधारित म्हैसाळ योजनेला कुठेही कालव्याचे काम नसून १०० टक्के पाइपचा वापर केला आहे. मूळ म्हैसाळ योजनेतील टप्पा क्रमांक तीन म्हणजे बेडग (ता. मिरज) येथून थेट पाणी उचलले जाणार आहे. त्यासाठी सहा टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे.

त्यातून ६५ गावांतील २६ हजार ५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यासाठी शासनाने १ हजार ९२८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पहिल्या टप्प्यासाठी ९८१.६० कोटी आणि दुसऱ्या टप्प्यासाठी ९७० कोटी रुपयांची तरतूद आहे.

पहिल्या टप्प्याची ९८१ कोटी ६० लाख ९२ हजार रुपयांचे काम सुरू आहे. बेडग (ता. मिरज) ते रामपूर मल्लाळ (ता. जत) असा ५८ किलोमीटरचा पहिला टप्पा असून २९ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. जून २०२५ पर्यंत रामपूर मल्लाळपर्यंतचे काम पूर्ण करण्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे उद्दिष्ट आहे.

रामपूर मल्लाळ येथून पुढे चार पोटकालवे असून मुंचडी (लवंगा) ६५.७४ किलोमीटर, कोळगिरी किलोमीटर, (गुडापूर) ४१.८४ वाशाण १७.३२ किलोमीटर आणि उमराणी ९.२५ किलोमीटर आहे. सुधारित म्हैसाळ योजनेचे १०० टक्के पाणी बंद पाइपद्वारेच कार्यक्षेत्रातील गावांमध्ये देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना असे मिळणार पाणीजत पूर्व भागातील ६५ गावांमधील प्रत्येक १२ ते १५ हेक्टरमध्ये पोट वितरिकेस सहा तोंडी वॉल असणार आहेत. या वॉल मधून शेतकऱ्यांनी पुढे पाणी घेऊन जायचे आहे. शेतकऱ्यांना मोजून पाणी मिळणार असून कुठेही पाण्याचा दुरुपयोग होणार नाही, असा दावा जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

दीड टीएमसी पाणी तलावात सोडणारसुधारित म्हैसाळ योजनेसाठी शासनाने सहा टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे. यापैकी साडेचार टीएमसी पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत देण्यात येणार आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यांमधून खोजनवाडी, बिळूर, संख, पांडोझरी आदी तलावांमध्ये दीड टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी दिली.

बेडगपासून डफळापूरपर्यंत एकूण बारा विद्युत पंपटप्पा क्रमांक १ बेडग ते रामपूर मल्लाळ चार पंप असून प्रती पंप क्षमता ११०० हार्स पावर आहे. टप्पा क्रमांक २ कुडणूर ते डफळापूर चार पंप असून प्रती पंप क्षमता १४२५ हॉर्स पावर आहे. डफळापूर ते वितरण हौद (येळदरी) चार पंप असून ३२७० हॉर्स पावरची क्षमता आहे.

सुधारित म्हैसाळ योजनेचे काम युद्धपातळीवर चालू आहे. पहिल्या टप्याचे ७० टक्केपर्यंत काम पूर्ण झाले असून जून २०२५ पर्यंत १०० टक्के काम पूर्ण होणार आहे. दुसऱ्या टप्प्याची निविदा मंजूर होऊन काम सुरु करण्याचे आदेशही दिले आहेत. जत पूर्व भागातील ६५ गावांना तातडीने पाणी देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. - चंद्रशेखर पाटोळे, अधीक्षक अभियंता

टॅग्स :पाटबंधारे प्रकल्पसरकारपाणीराज्य सरकारसांगलीशेतकरीशेतीजाटदुष्काळ