Join us

Mhaisal Yojana : म्हैसाळ योजनेचा कालवा फुटला ८० एकरांवरील पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 4:22 PM

शिरनांदगी (ता. मंगळवेढा) परिसरात म्हैसाळचा कालवा फुटून शेतकऱ्यांच्या जवळपास ८० एकराहून अधिक शेतीपिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मंगळवेढा : शिरनांदगी (ता. मंगळवेढा) परिसरात म्हैसाळचा कालवा फुटून शेतकऱ्यांच्या जवळपास ८० एकराहून अधिक शेतीपिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

दोन वर्षे दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना यंदा समाधानकारक उत्पन्नाची अपेक्षा असतानाच कालवा फुटल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडल्याचे दिसून येत आहे.

मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी दिले जाते. दरवर्षी या योजनेचे पाणी मागणी करूनही वेळेवर दिले जात नव्हते. यंदा राज्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.

यामुळे ते अतिरिक्त पाणी वितरिकेमार्फत सोडले जात आहे. यंदा तालुक्यातही मान्सूनच्या पावसाने वेळेवर हजेरी लावल्यामुळे बाजरी, तूर, मका, कांदा, सूर्यफूल या पिकांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला असतानाच कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला असल्याचे दिसत आहे.

यापूर्वी कालव्यातून झालेली गळती व दुरुस्तीची कामे वेळेवर न झाल्यामुळे यंदा सांगली, मिरज, कवठेमहांकाळ या भागात म्हैसाळच्या पाण्याची मागणी कमी असल्याने ते पाणी जत, सांगोला व मंगळवेढा तालुक्यात जास्त दाबाने सोडले जात आहे.

गळती झालेल्या ठिकाणी पाण्याचा दाब वाढल्याने कालवा फुटण्याचा प्रकार घडला. त्यामध्ये शिरनांदगी परिसरात जवळपास ८० एकराहून अधिक शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मका पिकाचे सर्वाधिक नुकसानजनावरांना खाद्य म्हणून उपयोगी पडणाऱ्या मक्याचे म्हैसाळचा कालवा फुटल्याने सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पशुधन जगवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. याशिवाय कांदा व इतर फळपिकांचेही नुकसान झाले आहे. सध्या राजकीय नेते निवडणुकीत तर यंत्रणा अंमलबजावणी करण्यात गुंतल्याने बाधित शेतकऱ्यांना वाली कोण? असा सवाल विचारला जात आहे.

मागणी नसताना वारंवार पाणी सोडल्याने शेतीला पाणी लागून पिकाचे नुकसान झाले. प्रशासनाने बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्यांना आचारसंहिता संपताच नुकसानभरपाई देऊन दिलासा देण्याची गरज आहे. - मायाक्का थोरबोले सरपंच, शिरनांदगी

टॅग्स :शेतीशेतकरीपीकमकापाणीपाऊसदुष्काळपाटबंधारे प्रकल्प