अरुण बारसकर
सोलापूर मिलेट सेंटर आता सोलापुरातच होणार आहे अन् त्यासंदर्भातील हैदराबाद येथील राष्ट्रीय तृणधान्य संशोधन संस्था (आय. आय. एम. आर.) व महाराष्ट्र राज्याच्या "स्मार्ट" प्रकल्पाच्या कराराचे सोपस्कर महिन्यात पूर्ण होणार आहेत.
बारामतीला मिलेट सेंटर हलविण्याचा तो आदेश राज्याच्या कृषी विभागाने रद्द करून आता सोलापूर येथे होणारे मिलेट इतर कोठेही होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
एक जिल्हा एक उत्पादन या आधारावर सोलापूर, नंदुरबार व ठाणे या जिल्ह्यांकरिता पौष्टिक तृणधान्य आधारित सूक्ष्म अन्न प्रक्रिया प्रकल्पाचा समावेश आहे. २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्यात आले.
त्याअनुषंगाने श्री. अन्नाच्या उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचा प्रचार, प्रसार, यांत्रिकीकरण प्रक्रिया, मूल्यसाखळी विकास याचा अंतर्भाव असलेले अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापूर येथे होणार होते. हेच केंद्र बारामती येथे स्थलांतरित करण्याचा निघालेला सुधारित आदेश वादात सापडला होता.
जिल्ह्यातील नेतेमंडळींनी विशेषतः आमदार सुभाष देशमुख यांनी आवाज तर उठविलाच शिवाय तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून मिलेट सेंटर सोलापूरमध्ये झाले पाहिजे यासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे मिलेट सेंटर सोलापूर येथे होण्यासाठी राज्य शासनाकडून सुधारित आदेश निघाला आहे.
हैदराबाद येथील राष्ट्रीय तृणधान्य संशोधन केंद्र (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट सेंटर) व आत्मा अंतर्गत स्मार्ट प्रकल्पाचा करार या महिन्यात होणार असल्याचे स्मार्ट प्रकल्प कार्यालयाकडून सांगण्यात आले.
मूळ आदेशानंतर दोन सुधारित आदेश..
■ ९ मार्च २०२३ रोजीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात सुमारे २०० कोटींची तरतूद असलेला महाराष्ट्र श्री अन्न (मिलेट) अभियान हा प्रकल्प सोलापुरात होणार असल्याची घोषणा केली.
■ १७ एप्रिल २०२३ रोजी या सोलापुरात होणाऱ्या मिलेट सेंटर संबंधीचा चार पानी स्वतंत्र आदेश राज्याचे तत्कालीन प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या सहीने निघाला.
■ २४ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या परिपत्रकानुसार श्री. अन्न अभियानांतर्गत श्री. अन्न उत्कृष्टता केंद्र बारामती येथे होईल असे म्हटलेला सुधारित आदेश निघाला.
■ १३ मार्च २०२४ रोजीच्या शासन परिपत्रकात २४ नोव्हेंबर २०२३ रोजी बारामती येथे श्री. अन्न उत्कृष्टता केंद्राबाबत परिपत्रकान्वये केलेली सुधारणा या शासन आदेशान्वये अतिक्रमित करण्यात येत आहे व १७ एप्रिल २०२३ च्या आदेशाची अंमलबजावणी करावी असे म्हटले आहे. त्यानुसार आता सोलापूरमध्ये मिलेट सेंटर होण्यासाठीचे सोपस्कार पूर्ण केले जात आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी ज्वारी, बाजरी, मका, आदी भरडधान्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेतकऱ्यांविषयीची आत्मीयता लक्षात घेऊनच सोलापूरमध्ये मिलेट सेंटर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केले होते. हे मिलेट सेंटर सोलापूरमध्ये होण्यासाठी प्रयत्न केले. ज्वारीवर प्रक्रिया उद्योग जिल्ह्यात सुरु होण्यासाठी प्रशिक्षण ते मार्केटिंग मिलेट सेंटरच्या माध्यमातून होईल. - सुभाष देशमुख, आमदार सोलापूर दक्षिण