Lokmat Agro >शेतशिवार > आरोग्यासाठी फायद्याचे मात्र आता होत आहे दुर्मिळ; जाणून घ्या कोणते आहेत हे भरडधान्य

आरोग्यासाठी फायद्याचे मात्र आता होत आहे दुर्मिळ; जाणून घ्या कोणते आहेत हे भरडधान्य

millet crops is health beneficial but now a day this millets farming is rare | आरोग्यासाठी फायद्याचे मात्र आता होत आहे दुर्मिळ; जाणून घ्या कोणते आहेत हे भरडधान्य

आरोग्यासाठी फायद्याचे मात्र आता होत आहे दुर्मिळ; जाणून घ्या कोणते आहेत हे भरडधान्य

भरडधान्य पिकांची ओळख आणि आरोग्यदायी महत्व

भरडधान्य पिकांची ओळख आणि आरोग्यदायी महत्व

शेअर :

Join us
Join usNext

कृषी क्षेत्राच्या विकास कार्यात भरडधान्य पिके उदा. वरई, राळा, बर्टी, नाचणी, बाजरी, कोडो काही प्रमाणात दुर्लक्षित राहिली होती परंतू पौष्टिक मुल्यांचा विचार उत्तम आरोग्याच्या दृष्टीने आहारविषयक जागृतीमुळे पिकांचे महत्व पुन्हा अधोरेखीत झाले आहे.

या बाबींचा विचार करता भारत सरकारने १३ एप्रिल २०१८ च्या राजपत्राव्दारे राळा, नाचणी, बर्टी, कोडो, बाजरी व ज्वारी यांची पौष्टिक तृणधान्ये (Nutri Cereals) या वर्गात समावेश केला आहे.

अशा या दुर्लक्षित राहिलेल्या पौष्टिक लघु भरडधान्य पिकांची ओळख आणि ओराग्यदायी महत्व या लेखात समजावून घेऊ.

नाचणी (Finger Millet)

ओळख : या पिकास नागली किंवा रागी या नावाने देखील ओळखले जाते. आपल्या हाताची बोटे अर्धवट दुमटल्यावर जसा आकार होतो तशाच काहीशा प्रकारच्या आकाराची नागलीची कणसे पक्व झाल्यानंतर दिसतात म्हणून त्यास इंग्रजीमध्ये फिंगर मिलेट म्हणतात. हे एकदल वर्गातील पीक असून मजबूत, काटक म्हणावे लागेल. साधारणतः १७० से. मी. उंच वाढते. फुटव्यांची संख्या ४ ते ८ पर्यंत असते. दुर्गम भागात राहणाऱ्या अदिवासी लोकांचे दुय्यम अन्न म्हणून नाचणीचा वापर होतो.

आरोग्यदायी महत्व : स्थुल व्यक्तीसाठी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सेवन नियमीत करावे. नाचणी शीतल आहे त्यामुळे पित्तशामक असून रक्तातील उष्ण दोष कमी करते. नैसर्गीक लोहाचाही उत्तम स्त्रोत असल्यामुळे गर्भाचा विकास होण्यास आणि स्तनदा मातांसाठी नाचणीचे सेवन अत्यंत आरोग्यदायी आहे. नाचणी हे कॅल्शीयमचा उत्कृष्ट स्त्रोत असून हाडाच्या आजारापासून संरक्षण मिळते. नाचणीतील पोषणद्रव्ये ही मधुमेही व्यक्तीसाठी अत्यंत फायदेशिर आहे.

बर्टी (Barnyard Millet)

ओळख : यास सावा, शामुल, सावन्ऱ्या नावानेही ओळखतात. हे एकदल वर्गातील पीक असून ५० ते १०० से.मी. सरळ उंच वाढते फुटव्यांची ४ ते ७ पर्यंत संख्या असते. पाने गवताच्या पात्याप्रमाणे सपाट, मऊ बारीक लव असते. बर्टी या तृणधाण्याची लागवड धान्य व चारा अशा दुहेरी हेतूने केली जाते. दुष्काळजन्य आणि अती पर्जन्यमान भागात हे पिक तग धरू शकते.

आरोग्यदायी महत्व : हे धान्य प्रथिनांचा चांगला स्त्रोत असून प्रथिने सहज पचण्याजोगी असतात. रक्तातील साखरेची आणि लिपीडची पातळी कमी करण्यासाठी प्रभावी असते. यातील नियासीन जीवनसत्वामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहाण्यास मदत होते. उपवासासाठी बर्टीचा वापर भाताप्रमाणे भिजवून केला जातो. बर्टी धान्य हे ग्लुटेनमुक्त असल्यामुळे ग्लुटेनची अॅलर्जी असणाऱ्यांना उपयुक्त असते.

कोडो (Kodo Millet)

ओळख : याला कोद्रा, पायगवत, भातगवत, खडक बाजरी या अन्य नावानेही ओळखले जाते. सुमारे ३ हजार वर्षापासून भारतात या पिकांची लागवड केली जाते. गुच्छेदार गवताप्रमाणे ते असून ९० से. मी. पर्यंत उंच वाढते. धान्य सर्वात जाडे भरडे असून तंतूमय पदार्थाचे प्रमाण जास्त आहे.

आरोग्यदायी महत्व : यात भरपूर तंतूमय पदार्थामुळे पचणास अत्यंत हलके आहे. अॅन्टी ऑक्सीडेंटचे प्रमाण चांगले आहे. कोडो हे ग्लुटेनमुक्त असल्याने त्याची अॅलर्जी असणाऱ्यांना उपयुक्त आहार आहे. मधुमेही रुग्णांना आहारामध्ये भाताला पर्याय म्हणून कोडो धान्य वापरण्याची शिफारस आहे.

वरई (Little Millet)

ओळख : वरी, कुटकी, सावा या नावांनी सुद्धा ओळखले जाते. धान्य सर्वात लहान आकाराचे असल्यामूळे यास इंग्रजीमध्ये लिटिल मिलेट असे म्हणतात. दुर्गम प्रदेशात राहाणाऱ्या लोकांचे वरई हे प्रमुख अन्न आहे. हे उपवासासाठी प्रमुख अन्न म्हणून भाताच्या स्वरूपात सेवन करतात. हे एकदल प्रकारातील पीक असून उंची ३० ते १५० से.मी. पर्यंत असते. पाने गवताच्या पात्याप्रमाणे असून मऊ व त्यावर लव असते.

आरोग्य दायी महत्व : बद्धकोष्टता आणि पोटाच्या विकारावर उपयुक्त तंतूमय पदार्थामुळे मधुमेही रुग्णांसाठी लाभदायक असते. शरीरात साठवलेल्या चरबीचे प्रमाण कमी करण्यात महत्वाची भुमिका, वीर्यातील शुक्राणूंची संख्या वाढविण्यासाठी उपयोगी. स्त्रियांमधील अनियमित मासिक पाळीच्या समस्येवर उपयुक्त.

राळा (Foxtail Millet)

ओळख : या पिकास जर्मन मिलेट असेही संबोधतात याचे कणीस झुपकेदार असून पक्वतेच्या वेळेस कोल्हयाच्या शेपटीसारखे अर्धगोलाकार होते. म्हणून यास फॉक्सटेल मिलेट असे म्हणतात. राळा हे एकदल प्रकारातील पीक असून ६० ते १०० से.मी. उंच तसेच खोड काडीसारखे सरळ वाढते. फुटव्यांची संख्या ४ ते ८ असते. पाने गवताळ असून लव असते.

पिकाचे महत्व : ४० ते ५० वर्षापूर्वी आहारात मुख्य अन्न म्हणून याचा समावेश होता. जगातील एकुण पौष्टिक तृणधान्य उत्पादनात राळा पिकाचा दुसरा क्रमांक असून अंदाजे सहा दशलक्ष टन उत्पादन होते. पिकाचावाढीचा वेग जास्त असल्याने कमी दिवसात जीवनक्रम पुर्ण होतो त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही हे पीक तग धरू शकते. मानवी आहाराप्रमाणेच धान्याचा उपयोग पाळीव पक्षांसाठी, खाद्यान्न तसचे कडब्याचा उपयोग जनावरांसाठी होतो.

भरड धान्यातील पोषणमुल्ये

क्र.पीकउर्जा किलो कॅलरीप्रथिने (ग्रॅम)कॅल्शीयम (मि.ग्रॅम)लोह (मि.ग्रॅम)कर्बोदके (ग्रॅम)
नाचणी ३२८७.३३४४३.९७२.०
सावा३४१७.७१७९.३६७.०
वरई३४११२.५१४०.८७०.४
राळा३३११२.३३१२.८६०.९

स्त्रोत : राष्ट्रीय पोषण मुल्य संस्था

लेखक
प्रा. संजय बाबासाहेब बडे
सहाय्यक प्राध्यापक
कृषी विद्या विभाग, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय
दहेगाव ता. वैजापूर जि. औरंगाबाद पिन कोड ४२३७०३ मो.नं. ७८८८२९७८५९.

हेही वाचा - शेती मातीची आवड असेल तर कृषी क्षेत्राच्या या शैक्षणिक संधी सोडू नका

Web Title: millet crops is health beneficial but now a day this millets farming is rare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.