महाराष्ट्राचे निसर्गकवी, प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ कवी पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित ना.धों.महानोर ( वय ८१ ) यांचे दीर्घ आजाराने आज सकाळी 8,30 वाजता रुबी हॉस्पिटल पुणे येथे निधन झाले.
त्यांच्या रूपाने एका प्रतिभाशाली आणि आपल्या शब्दांनी रसिकांना समृद्ध करणारा कवी आणि भूमिपुत्र हरपला याचे अतीव दुःख आहे . दोन वेळा विधान परिषदेचे आमदार म्हणून त्यांनी काम केले होते, ते पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेचे जनक म्हणून ओळखले जात तसेच हायटेक ऍग्री कल्चर शेतीचे ते पुरस्कर्ते होते. आमच्या परिवाराचे ज्येष्ठ सदस्य असलेल्या महानोर दादांना आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असल्याची भावना जैन इरिगेशन सिस्टिम्सचे अध्यक्ष, उद्योजक अशोक जैन यांनी व्यक्त केली आहे.
साहित्यिक असलेले ना.धो. महानोर हे प्रगतीशील शेतकरी होते. मातीतला कवी अशी त्यांची ओळख होती. अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेले त्यांचे गाव पळसखेडे आणि जवळच असलेले उद्योजक भवरलालजी जैन यांचे वाकोद हे गाव आणि शेती-प्रगतीचा समान वैचारिक धागा यामुळे ते जैन परिवाराचे कौटुंबिक सदस्य झाले होते.
शेती, पाणी, पर्यावरण यामध्ये ना. धो. महानोर यांचे काम दखलपात्र होते. १९८०च्या सुमारास काढलेली शेतकरी दिंडी, शेतीसाठी पाणी. जलसंधारण, फलोत्पादन, ठिबक यासारख्या अनेक गोष्टीवर त्यांचे काम होते. महाराष्ट्र शासनाने त्यांना प्रयोगशील शेतीबद्दल कृषिभूषण पुरस्कार देऊन गौरविले होते. तसेच पाणी, पर्यावरण आणि पाणलोटाच्या कामाबददल त्यांना वनश्री पुरस्काराने गौरविले होते. कृषी रत्न सुवर्णपदक, डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार यांसह शेती, पाणलोट आणि पर्यावरणाच्या कामासाठी त्यांना असंख्य पुरस्काराने गौरविले होते.
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे ते आमदारही होते. त्याकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि शेती व ग्रामविकासाशी संबंधित आवश्यक निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा केला. रोजगार हमीशी निगडीत कोरडवाहू फळबाग योजना, पाणी अडवा-पाणी जिरवा, जलसंधारण मोहिम, फलोद्यान, ठिबक सिंचन, सामाजिक वनीकरण अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटिवला. इस्त्रायल येथील जागतिक ॲग्रीटेक कृषी प्रदर्शनासह, तेथील शेतीचा त्यांनी अभ्यास केला होता.
पळसखेडा व जळगाव परिसरात शेतकरी व ग्रामस्थ त्यांना प्रेमाने महानोर दादा म्हणून संबोधत असत. मात्र आज त्यांच्या अचानक जाण्याने हजारो शेतकरी शोकसागरात बुडाले आहेत.