नितीन काळेल
शेती बेभरवशाची म्हणतात. पण, बाजारपेठेचा अभ्यास हवामान विभागाचा सल्ला यातून शेती केली तर फायदेशीर ठरते. त्यातच आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन तरुण शेतकरी लाखोंची उड्डाणे घेऊन यशाची गुढी उभारत आहेत. यामुळे वेळ आणि पैसाही वाचत आहे. मजूरही कमी लागत आहेत.
पूर्वी शेती पारंपरिक पद्धतीने केली जात होती. पिकणाऱ्या उत्पन्नातून बियाणे काढून ठेवून ते पुढील वर्षाच्या हंगामात पेरणीसाठी वापरले जात. त्यामुळे उगवण क्षमता कमी व्हायची. परिणामी उत्पन्न कमी मिळायचे.
गेल्या काही वर्षांत बी-बियाणांमध्ये बदल झाले. संकरित वाण विकसित झाले. यामुळे कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न मिळू लागले. काही वाण तर कमी पाण्यावरही येत आहेत. हे झाले उत्पन्नाच्या बाबतीत, पण, या तरुण शेतकऱ्यांच्या मदतीला आता आधुनिक तंत्रज्ञान आले आहे. नवनवीन यंत्रे आली आहेत. यामुळे वेळ आणि पैसाही वाचू लागलाय.
काही वर्षांपूर्वी पाऊस पडल्यावर भात पिकासाठी चिखलणी करावी लागायची. पाऊस कमी पडला तर पाणी सोडून ती करावी लागत होती. यासाठी बैल किंवा जनावरांच्या मदतीने चिखलणी होत होती. पण, आता चिखलणी करण्यासाठी यंत्रे आली आहेत. पॉवर टिलर व रोटावेटर यांच्या माध्यमातून चिखलणी करण्यात येत आहे.
यामुळे वेळ व कष्ट वाचत आहे. तर हाताने भात लावण्याची पद्धत बदलत चालली आहे यंत्राच्या साह्याने भात लागवड करता येते. परिणामी दोन रोपे लावणीतील व ओळीतील अंतर योग्य राहत आहे. याचा फायदा उत्पन्नासाठी होतो.
भात काढणीसाठी पूर्वी माणसे लागायची. काही वेळा तर मजूर उपलब्ध होत नसत. प्रसंगी अधिक मजुरी द्यावी लागायची. पण, यांत्रिकी युगात रीपरच्या साह्याने भात काढणी करण्यात येत आहे. तर पूर्वी खळ्यावर भात काढणी करावी लागत होती आता त्याठिकाणी मशिनरी आली आहे. त्यामुळे काही वेळातच भात घरात येऊन पडतो. ही किमया या यंत्राच्या साह्याने झाली आहे.
शेतीतील महत्त्वाचा भाग म्हणजे भांगलणी. यासाठी मनुष्यबळ मोठे लागते. तसेच वेळही लागायचा, आता पीकनिहाय विविध तणनाशके उपलब्ध आहेत. उसातील अंतर्गत मशागत बैलाच्या साह्याने केली जात होती. त्याची जागा पॉवर टिलरने घेतली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैशांची बचत होत आहे.
तसेच सर्व कामे वेळेत पार पडतात. सद्यस्थितीत तर ज्वारी, बाजरी, गहू किंवा इतर पिकांच्या पेरणीसाठी बैलांपेक्षा यंत्रांचा वापर केला जात आहे. ही सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचीच किमया आहे. तसेच नवीन शेतकऱ्यांनी त्याचा उपयोगही करून घेतला आहे.
ड्रोनद्वारे औषध फवारणी
पिकांवर किंवा फळबागांवर औषध फवारणी करावी लागते. यासाठी पंप असतात. अनेक वर्षापूर्वी पायाने पंप मारून औषध फवारणी केली जात होती. त्यासाठी दोन-तीन माणसे लागायची. त्यानंतर बदल झाला. पाठीवरील पंप आला. त्याला एका हाताने पंप मारावा लागायचा तर दुसऱ्या हाताने औषध फवारणी करावी लागत होती. आता पाठीवरील पंपही पेट्रोलवर चालत आहे. काही शेतकरी तर ट्रॅक्टरच्या साहाय्याने फवारणी करतात. यापुढील बदल म्हणजे ड्रोनद्वारे औषध फवारणी तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. याचा वापरही तरुण शेतकरी करू लागले आहेत.