निसर्ग आणि मानव हे या पृथ्वीतलावरील महत्त्वाचे घटक. मानवाच्या प्रगतीमुळे निसर्गाचे दिवसेंदिवस नुकसान होत आहे. पण निसर्गातील अनेक गुपिते मानवाला अजूनही उलगडलेली नाहीयेत. निसर्ग वातावरणात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे प्रतिबिंब कुठेतरी दाखवत असतो. भविष्यातील घडणाऱ्या घडामोडींचे संकेत हे निसर्गच दाखवत असतो. हंगामात किती पाऊस पडेल याचे संकेतसुद्धा निसर्गातच दडून बसलेले आहेत. अनेक गोष्टीतून निसर्ग पावसाचे संकेत देत असतो. त्याचप्रमाणे जुने लोकं कावळ्याच्या घरट्यावरून पावसाचे प्रमाण काढायचे हे आपल्याला माहितीये का? चला तर जाणून घेऊयात.
निसर्गातील वनस्पती, प्राणी त्यांच्या वर्तनातून संकेत देत असतात. हे संकेत जुन्या जाणत्या लोकांना माहिती असतात. कारण त्यांच्याकडे तेवढी निरिक्षणक्षमता असते. कावळा हा हंगामात पाऊस किती पडणार याचे संकेत देणारा निसर्गातील सर्वांत पहिला आणि महत्त्वाचा घटक मानला जातो. कावळा एखाद्या घरावर घरटे किती उंचीवर बांधतो यावरून मान्सूनच्या पावसाचा अंदाज लावला जात होता.
कावळ्याचे घरटे जर झाडाच्या शेंड्यावर, जास्त उंचीवर असेल तर त्यावर्षीच्या हंगामात पाऊस अत्यल्प किंवा खूप कमी पडत असतो. कावळ्याचे घरटे जर झाडाच्या मध्यभागी असेल तर त्यावर्षी सर्वसाधारण पाऊस पडत असतो आणि जर कावळ्याने खाली किंवा कमी उंचीवर घरटे बांधले तर त्यावर्षी पाऊस खूप जास्त पडत असतो असं म्हणतात. त्याचबरोबर कावळा झाडाच्या कुठल्या दिशेला घरटे बांधतो त्यावरूनही पावसाचे अंदाज सांगितले जातात.
टिटवी
टिटवी ज्यावेळेस एप्रिल मे महिन्यामध्ये आपले घरटे तयार करते त्यावेळेस जूनमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असते. पण टिटवीचे घरटे जमिनीवर असते. टिटवीच्या घरट्याच्या जागेवरून आणि तिने घातलेल्या अंड्यावरून पावसाचे अंदाज सांगितले जातात. टिटवीचे घरटे तळ्याच्या किंवा नदीच्या कोरड्या पात्रामध्ये किंवा नदीपात्राच्या जवळ असते त्यावर्षी पावसाचे प्रमाण खूप कमी असते किंवा त्यावर्षी दुष्काळ पडतो असं म्हणतात. दरम्यान, जर टिटवीने एक किंवा दोन अंडी घातले तर त्यावर्षी पाऊस अगदीच कमी पडतो असं समजतात. तर टिटवीने चार अंडी दिले तर त्यावर्षी पाऊस चांगलाच पडेल असे संकेत असतात.
त्याचबरोबर निसर्गातील अनेक घटक पावसाच्या प्रमाणाचे संकेत देत असतात. जुन्या जाणकारांना पावसासंदर्भात अनेक निसर्ग संकेत माहिती असतात.
(वरील माहिती ही जुन्या-जाणत्या लोकांच्या माहितीच्या आधारे दिलेली आहे. या माहितीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.)