Lokmat Agro >शेतशिवार > मूल येथे राज्यातील सर्वोत्कृष्ट कृषी महाविद्यालय करणार

मूल येथे राज्यातील सर्वोत्कृष्ट कृषी महाविद्यालय करणार

Mool will do the best agricultural college in the state | मूल येथे राज्यातील सर्वोत्कृष्ट कृषी महाविद्यालय करणार

मूल येथे राज्यातील सर्वोत्कृष्ट कृषी महाविद्यालय करणार

कृषी क्षेत्राचे बजेट 4 हजार कोटींवरून किमान 10 हजार कोटी असणे आवश्यक- सुधीर मुनगंटीवार

कृषी क्षेत्राचे बजेट 4 हजार कोटींवरून किमान 10 हजार कोटी असणे आवश्यक- सुधीर मुनगंटीवार

शेअर :

Join us
Join usNext

स्थानिक तरुणांचा शेतीकडे कल वाढावा व त्याला कृषी  क्षेत्रातील तांत्रिक आणि सखोल ज्ञान मिळावे, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून मूल येथे कृषी महाविद्यालय उभे करण्याचा संकल्प केला आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी हे महाविद्यालय राज्यातील सर्वोत्कृष्ट राहणार असल्याची ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या बांधकामासाठी वनजमीन वळतीकरण करण्यासंदर्भात तसेच विशेष निधी उपलब्ध होण्यासाठी वनामती (नागपूर) येथे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मुनगंटीवार बोलत होते. बैठकीला कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव तथा चंद्रपूरचे पालकसचिव अनुपकुमार, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य संरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. श्यामसुंदर माने, कुलसचिव सुधीर राठोड, सा.बा. विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले आदी उपस्थित होते.

शेतात राबणारा शेतकरी अन्न पिकवितो, त्यामुळे कृषी क्षेत्रासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कृषी आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याला आपले प्राधान्य आहे. कृषी क्षेत्राचे बजेट 4 हजार कोटींवरून किमान 10 हजार कोटी असणे आवश्यक आहे, त्यासाठी हा विषय मंत्रिमंडळात ठेवला जाईल.

मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या जागेसंदर्भात शासकीय व खाजगी जागा येत्या 10 दिवसांत शोधून निर्णय घ्यावा. बांधकामासाठी आवश्यक जागा उपलब्ध न झाल्यास मूल येथील कृषी महाविद्यालयासाठी वनविभागाची जमीन वळती करण्यासाठी 13 कोटी 48 लक्ष रुपये विशेष निधी भरण्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत मूल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास 28 फेब्रुवारी 2019 मध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत 35 कोटी एवढे अनुदान विद्यापीठास वितरीत करण्यात आले आहे. मूल-मारोडा येथील कृषी तंत्र विद्यालयाच्या उपलब्ध इमारतीमध्ये सन 2019-20 या सत्रापासून कृषी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. 1 ऑक्टोबर 2022 पासून मॉडेल स्कूल, मूल येथे सदर महाविद्यालय भाडेतत्वावर स्थलांतरीत करण्यात आले आहे. सन 2023-24 या कृषी शैक्षणिक सत्रात बी.एस.सी. (ऑनर्स) चे एकूण 189 विद्यार्थी शिक्षण घेत आहे.

भविष्यात कृषी महाविद्यालयात वाढणारी विद्यार्थी संख्या व त्या अनुषंगाने लागणारे प्रक्षेत्र, विविध युनीट, क्रीडांगण, नवीन इमारतीचे बांधकाम, विविध कार्यालये, वर्ग खोल्या, 17 कृषी  विषयाच्या विविध प्रयोगशाळा, मुला-मुलींचे वसतीगृह, रोजगार निर्मिती केंद्र, शेती प्रयोगाकरीता प्रक्षेत्र, प्रक्षेत्रावरील गोडवून आदींसाठी कृषी महाविद्यालयासाठी 40 हे. आर. मर्यादीत म्हणजे 39.50 हे. आर जमीन प्रस्तावित केलेली आहे.

Web Title: Mool will do the best agricultural college in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.