Join us

Mug, Udid Crop : मुगात फुले सुवर्ण, उडीद पिकात फुले राजन एकदम बेस्ट, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 5:09 PM

Mug, Udid Crop : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी मुगात फुले सुवर्ण आणि उडीद पिकामध्ये फुले राजन या यंत्राने काढणीस योग्य असलेल्या जाती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहेत.

Agriculture News : उडीद आणि मूग (Udid, Mug) अतिशय कमी दिवसांमध्ये येणारे आणि पिकांचे फेरपालटसाठी अतिशय महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. जे जमिनीची, मानवाची आणि प्रकृतीची काळजी घेतात. या पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चाललेले असून बाहेरील देशांमधून हे पीक आयात करतो.

फार मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन आपल्याला या पिकांसाठी द्यावे लागते. हे पीक प्रामुख्याने खरीप (Kharif Season) हंगामात घेतले जाते, मात्र हवामानातील बदल, अवेळी पडणारा पाऊस, उशिरा येणारा आणि उशिरापर्यंत थांबणारा मान्सूनचा पाऊस या पिकामध्ये क्षेत्र कमी करण्यास कारणीभूत ठरत आहेत. 

सगळ्यात महत्त्वाच म्हणजे या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता असते. मात्र अनेकदा मजूर आपल्याला उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे या पिकांमध्ये मशीनद्वारा काढणीस योग्य असलेले वाण निर्माण करण्याचं ध्येय, उद्दिष्ट समोर ठेवून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी यावर्षीचे दोन वाण उडीद आणि मुगाचे दिलेले आहेत. त्यामध्ये मुगात फुले सुवर्ण आणि उडीद पिकामध्ये फुले राजन या जाती विशेषतः यंत्राने काढणीस योग्य अशा आहेत. 

मूग पिकामध्ये फुले सुवर्ण वाण

मुग पिकामध्ये खरीप हंगामामध्ये बदलत्या हवामानात किंवा उशिरा लागवडीस योग्य असलेली फुले सुवर्ण ही जात अप्रतिम असून  शेंगा लांबीने जरी लहान असल्या तरीही शेंगांची गुच्छ जास्त प्रमाणात लागून जास्त उत्पादन देणारे ठरलेले आहे. दुसरा बहार हा या जातीतला पहिल्या बहार पेक्षा जास्त येतो. हे या वर्षात खरिपात घेण्यात आलेल्या प्रयोगावरून लक्षात आलेले आहे. आणि हा दुसरा बहार आपण जर यांत्रिक पद्धतीने काढल्यास शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणावर मजुरांवर होणारा खर्च बचत होत असल्याचं यावर्षी लक्षात आले. 

मूग पिकाची फुले सुवर्ण वाण उभट वाढणारी, न लोळणारी, मध्यम आकाराचा दाणा असलेली आणि प्रथिनांचा जास्त प्रमाण असलेली आणि भुरी रोगास प्रतिकारक्षम वाण असल्याने उत्पन्नात बदलत्या हवामानात तग धरणारी वाण असल्याने उत्पन्नात कोणताही फरक पडत नाही, हे लक्षात आले. खरीप 2024 या हंगामामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडून गेला. सततचा पाऊस असूनही या जातीने एकरी चार क्विंटल उत्पन्न दिले आहे.

यांत्रिकी पद्धतीने  काढणीस योग्य असलेला आणि हवामान बदलास तग धरणारा, वेगवेगळ्या हवामानामध्ये येणारा हा वाण भारतातील एकमेव ठरणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारा प्रसारित झालेला मूग पिकाचा हा वाण शेतकऱ्यांसाठी भविष्यात उत्पादनात मोठे योगदान देणारा ठरणार आहे. शिवाय पीक पद्धतीमध्ये बदल करण्यास कारणीभूत ठरणार आहे. 

उडीद पिकामध्ये फुले राजन वाण 

महात्मा फुले कृषी विद्यापीठा द्वारा उडीद पिकामध्ये फुले राजन हा वाण प्रसारित झालेला असून, हा उभट वाढणार असल्याकारणाने यांत्रिकी पद्धतीने काढण्यास अतिशय सुयोग्य आहे. त्या कारणास्तव शेतकऱ्यांची काढणीला लागणारा वेळ आणि मजुरीवरचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. या वाणाचे वैशिष्ट्य असे आहे की हा वाण शेंगा पोखरणाऱ्या अळीस प्रतिकारक्षम असल्याने कोणत्याही प्रकारची कीड शेंगा काढण्याच्या वेळेस लागलेली दिसत नाही.

शिवाय उत्पादनात इतर जातींपेक्षा 20 टक्के जास्त उत्पादन देणारा, काळाभोर जाड दाणा आणि भुरी आणि पिवळा विषाणू रोगास प्रतिकारक्ष असलेला वाण आहे. यावर्षी तेलबिया संशोधन केंद्र जळगाव अंतर्गत असलेल्या ममुराबाद प्रक्षेत्रावर प्रायोगिक तत्त्वावर या दोघ पिकांमध्ये यांत्रिकी पद्धतीने काढण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याने येणाऱ्या काळात उडीद आणि मूग पिका खालील क्षेत्र आणि उत्पादनात वाढ होणार आहे.

संकलन : प्रा.डॉ.सुमेर सिंग राजपूत, कडधान्य पैदासकर्ते, तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीजळगावकाढणी