Mosambi Bahar : जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादकांना हवामान बदलाचा मोठा सामना करावा लागत आहे. मोसंबीच्या बहराला ताण देताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.
मोसंबी उत्पादक शेतकरी प्रामुख्याने आंबे बहराची मोसंबी जालना जिल्ह्यामध्ये उत्पादित करतात. आंबे बहर हा खात्रीचा बहर मानला जात असला तरीही गेल्या २-३ वर्षांपासून वेगवेगळ्या कारणाने होणारी फळगळ आंबे बहरासाठी प्रचंड धोक्याची बनली आहे. मोसंबी उत्पादक शेतकरी चक्क बागा काढून टाकत आहे. तर काही उत्पादक आपली मोसंबी काढण्याच्या तयारीत आहेत.
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत नसल्याने मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणी सापडले आहेत. आंबे बहरासोबतच मृगभाराच्या मोसंबीचे शेतकऱ्यांकडून उत्पादनदेखील घेतले जाते. त्यामध्येच हवामान बदलामुळे काही बदल झाल्यास हस्तबहर झाडावर येतो.
कृषी शास्त्रज्ञांच्या मते झाडावर वारंवार फळे राहिल्याने मोसंबीची बाग हवी तशी विकसित करता येत नाही. त्यामुळे बागेचा प्रचंड ऱ्हास होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते.
बऱ्याच ठिकाणी आज घडीला मोसंबीच्या बागेवर मृगभाराची मोसंबी आहे. ती आता विक्रीस आलेली आहे. अंबे मोहराची मोसंबी येण्यास उशीर आहे.
मोसंबी बागेचे क्षेत्र घटले
जिल्ह्यामध्ये एकेकाळी ३७ हजार हेक्टरच्या वर मोसंबीचे क्षेत्र होते. दरवर्षी मोसंबी उत्पादकांना झालेला खर्चही पिकातून मिळत नसल्याने काही बागा दुष्काळात नष्ट झाल्या आहेत. आज घडीला २० ते २२ हजार हेक्टरच्या आसपास मोसंबीचे क्षेत्र जिल्ह्यामध्ये तग धरून आहेत.
शेतकऱ्यांनी बागा तोडू नये
हवामान बदलामुळे मोसंबीच्या अंबे बहरावर परिणाम होत आहे. तरी, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरू नये. कुठल्याही परिस्थितीत बागा तोडू नका. निर्माण झालेल्या समस्यावर मार्ग निघत असतो. यामुळे उत्पादकांनी धीर धरावा. - डॉ. एम. बी. पाटील, मोसंबी शास्त्रज्ञ