Join us

Mosambi Fruit Drop दहा दिवसांमध्ये चार टन मोसंबीची फळगळ; उर्वरीत मोसंबीची शेतकऱ्यांकडून बेभाव विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 10:37 AM

मोसंबी फळगळीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. मोसंबीच्या सुरू असलेल्या फळगळीमुळे शेतकरी मोसंबीची विक्री बेभाव करीत आहे.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव परिसरात मोसंबी फळगळीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. मोसंबीच्या सुरू असलेल्या फळगळीमुळे शेतकरी मोसंबीची विक्री बेभाव करीत आहे. राणीउंचेगाव येथील शेख नासेर या शेतकऱ्यांचे दहा दिवसांच्या कार्यकाळात चार टन मोसंबीची फळगळ झाली आहे. फळगळीच्या धास्तीने शेख नासेर या शेतकऱ्याला राहिलेल्या मोसंबीची बेभाव विक्री करावी लागली.

राणीउंचेगाव परिसरात मोसंबीची होणारी फळगळ शेतकऱ्यांसाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे. विविध प्रकारच्या औषधींची फवारणी करूनदेखील फळगळीवर प्रतिबंध होत नाही. त्यामुळे मोसंबी शेतकरी संकटात सापडला आहे. मागील पाच वर्षांपासून होत असलेली फळगळ यंदाही अधिक तीव्र बनली आहे. या वर्षीची फळगळ ही जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे.

कृषी विभागाच्या वतीने देण्यात येत असलेल्या उपाययोजनेनुसार मोसंबी फळगळीवर प्रतिबंध होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या संकटाची दखल आता विद्यापीठाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी घ्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. यावर कृषी विभागाकडूनही दुर्लक्ष केले जात आहे.

कृषी विभागाने फळगळीवर आयोजित केला मार्गदर्शन मेळावा

● कृषी विभागाने फळगळीवरी मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता; परंतु या मेळाव्याची माहिती न मिळाल्याने शेतकरी अनुपस्थित राहिले होते. याबाबतचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच. 

● जिल्हा कृषी विभाग व तालुका कृषी विभागाने दखल घेऊन राणीउंचेगाव मंडळात गुरुवारी एका ठिकाणी मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता.

माझ्याकडे असलेल्या चारशे झाडांच्या मोसंबी फळबागेत जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच फळगळ सुरू झाली. या फळगळीमुळे फक्त दहा दिवसांत चार टन मोसंबी गळाली. त्यामुळे मी राहिलेल्या मोसंबीच्या फळगळीच्या धास्तीने बाजारात २५ ते ३० हजार प्रतिटनाप्रमाणे विक्री होणारी मोसंबी १५ हजार रुपये टनाने वक्री केली. - शेख नासेर, शेतकरी राणीउंचेगाव.

फळगळ होत असेल तर करा हा उपाय 

 

टॅग्स :फळेशेतीशेतकरीपीक व्यवस्थापनफलोत्पादनशेती क्षेत्रजालनामराठवाडाबाजार