Join us

मोसंबीच्या बागा सुकल्या; पाणी नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 5:36 PM

शिऊर परिसरातील स्थिती

विजय जाधव

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिऊर (ता. वैजापुर) परिसरात सध्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. त्यातच भूगर्भातील जलसाठाही अत्यंत खालावल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. तसेच शेतातील विहिरीही आटल्याने शेतकऱ्यांच्या मोसंबीच्या बागा सुकायला लागल्या असून शेतकरी बांधव अडचणीत सापडले आहेत.

दोन पैसे शिल्लक मिळावे, यासाठी शिऊर परिसरात अनेक शेतकऱ्यांनी मोसंबी बागांची लागवड केली आहे. आतापर्यंत तळहाताप्रमाणे सांभाळलेल्या या बागा यंदा पाण्याअभावी धोक्यात सापडल्या असून सुकत आहेत. उन्हाळाही तीव्र असल्याने विहिरींनी तळ गाठला असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. परिसरात यंदा अत्यल्प पाऊस झाला, परिणामी जमिनीचे जलपुनर्भरण झाले नाही, यामुळे जलसाठे कोरडे पडले आहेत.

याचा सर्वाधिक फटका मोसंबी बागांना बसत असून अनेक शेतकऱ्यांच्या बागा सुकून गेल्या आहेत. तर काही शेतकरी टँकरचे विकतचे पाणी घेऊन बागा जगविण्यासाठी आटापिटा करीत असल्याचे दिसत आहे.

पंचनामा करून मदत देण्याची मागणी...

• बाजारात मोसंबीची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. दुसरीकडे मोसंबी उत्पन्नाचे प्रमाण पाण्याअभावी कमी झाले आहे.

• दरम्यान बाग सुकल्याने तातडीने पंचनामा करावा आणि शासकीय मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा - दुष्काळात फळबाग संशोधन केंद्राने विकसित केलेले हे तंत्र वापरा आणि फळबागा वाचवा

टॅग्स :दुष्काळपाणीकपातशेतीफळेमराठवाडाउष्माघात