रविवारपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप, रब्बी पिके धोक्यात आली आहेत. मात्र, याचा सर्वाधिक फटका मोसंबी बागांना बसत आहे. सध्या आंबेबहार फुटण्याचा कालावधी असून, यासाठी बागांना ऐन ताण देण्याच्या दिवसांतच दररोज पाऊस पडत असल्यामुळे मोसंबीचा आंबेबहर धोक्यात आला आहे. यामुळे मोसंबी बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पाचोड मोसंबीचे माहेरघर पाचोड़ परिसरात सर्वाधिक मोसंबीच्या बागा असून उत्पादनातही अव्वल आहे. यामुळेच परिसराला मोसंबीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पाचोड येथे राज्यातील सर्वात मोठी मोसंबीची बाजारपेठ आहे. येथे विविध राज्यांतून व्यापारी मोसंबी खरेदीसाठी येतात, येथील मोसंबी सातासमुद्रापारही गेलेली आहे; मात्र यंदा अवकाळी पावसामुळे या पिकाचा आंबेबहार धोक्यात आला आहे.
गेल्या चार दिवसांपासून पाचोड परिसरात वातावरणात बदल झाला आहे. रविवारपासून दररोज रात्रीच्या सुमारास विजांच्या कडकडाटात व सोसाट्याच्या वाऱ्यासह बिगरमोसमी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे पाचोड परिसरातील कापूस, मका, ज्वारी, गहू, कांदा, हरभरा, उसासह अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शिवाय या पावसाचा फटका मोसंबीच्या आंबेबहाराला बसत आहे.
सध्या आंबेबहारचा मोहोरमोसंबी पिकाला आंबा, मृग व हत्ती बहार असे वर्षातून तीन बहार येतात. आंबा बहार फुटण्यासाठी साधारणपणे एक महिन्याचा कालावधी असतो. या महिनाभरात मोसंबीला ताण दिला जातो; पण अचानक अवकाळी पावसाने आंबेबहारला फटका बसणार आहे. -अंकुशराव भुमरे, शेतकरी, पाचोड
पैठण तालुक्यात १२ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी मोसंबीची लागवड केलेली आहे. सध्या आंबेबहारसाठी शेतकऱ्यांनी मोसंबीला ताण दिलेला आहे; मात्र अवकाळी पावसामुळे ताण बसणार नाही, परिणामी बहार फुटणार नाही, यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. - संदीप शिरसाट, तालुका कृषी अधिकारी, पैठण
हा मोसंबी लागण्याचा काळ असून, त्यासाठी शेतकरी किमान ३५ दिवस मोसंबी फळबागेला पाण्याचा ताण देतात. यामुळे आंबेबहार चांगल्या पद्धतीने फुटून झाडांना चांगली फळे लगडतात; तसेच या कालावधीतच मोसंबी पिकामध्ये मशागत केली जाते. खते, औषधी दिली जातात. डिसेंबरमहिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोसंबीच्या बागांना चांगला ताण आल्यावर झाडावरील पानगळ होऊन आंबेबहार फुटण्यासाठी थोडं थोडं पाणी दिलं जाते; पण अवकाळी पावसामुळे मोसंबीचा आंबेबहारच धोक्यात आला असून, बागायतदार शेतकरी घाबरले आहेत.