मोसंबी बागेवर सततसंकट येत असल्याने शेतकऱ्यांना खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फळबागा आता पांढरा हत्ती पोसण्यासारख्या झाल्या आहेत. अनेक शेतकरी नाइलाजाने फळबाग मोडून काढत आहेत. दरम्यान, जालना तालुक्यतील निधोना येथील अंकुश खडके या शेतकऱ्याने पाचशे मोसंबीच्या झाडांची बाग तोडून टाकली आहे.
यंदा दुष्काळी वातावरण असल्याने मोसंबीच्या बागेपासून खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मिळत नसल्याचे दिसत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. निधोना येथील शेतकऱ्याने पाचशे मोसंबीच्या झाडांची लागवड केली होती. परंतु, यंदा दुष्काळी स्थितीमुळे बागांना पाणी देण्याचा प्रश्न उद्भवलेला आहे. पाणी मिळत नसल्याने झाडे करपू लागल्याचे दिसून आले.
गतवर्षी मोठ्या प्रमाणात या फळबागेवर खर्च केला. त्यामुळे यंदा या बागेपासून चांगले उत्पादन होईल, अशी आशा होती. परंतु, यावर्षी वारंवार अतिवृष्टी झाल्यामुळे फळांची हानी झालेली आहे. जालना तालुक्यात पाण्याअभावी फळबागा धोक्यात आल्या असून, अनेक बोअर, विहिरींना पाणी नसल्याने शेतकरी मोसंबीच्या बागा मोडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जालना तालुक्यातील निधोना येथील शेतकरी अंकुश खडके यांची अडीच एकरमध्ये पाचशे झाडांची मोसंबी फळबाग होती. या झाडाला आठ वर्षे झाले असून, आता पाण्याअभावी व मोसंबी भाव मिळत नसल्याने ही झाडे जेसीबीच्या साहाय्यने उपटून टाकली आहे. मोसंबी झाडे लावल्यानंतर पाच वर्षांनी त्याला फळ लागतात. आता कुठे फळ लागणे चालू झाले होते.
मात्र, मोठी झालेली झाडे तोडून टाकण्याची वेळ खडके यांच्यावर आली आहे. झाडे तोडल्यामुळे शेतकऱ्याचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या भागात जमीन फळबागांना पोषक असल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर मोसंबीचे क्षेत्र आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने भूजलपातळी झपाट्याने खालावत चालली आहे.
हेही वाचा - टरबूज खाणे फायदेशीर; पण ते केमिकल द्वारे पिकविलेले असेल तर?
माझ्याकडे पाचशे मोसंबीची झाडे होती. बाजारपेठेत भाव मिळत नाही तसेच पाणीटंचाईमुळे बागांची जपवणूक करणे अवघड बनले आहे. यामुळे जेसीबीद्वारे झाडे काढून टाकली आहेत. आमच्या भागात भीषण अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन उपाययोजना कराव्यात. - अंकुश खडके, शेतकरी, निधोना.
पाण्याची भीषण टंचाई
१. बोअर, विहिरींनी तळ गाठला आहे. परिसरात पाणीटंचाईची भीषण स्थिती निर्माण झालेली आहे. याचा फटका फळबागेला बसत आहे.
२. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये थोडेफार पाणी आहे, ते जनावरांसाठी राखून ठेवले आहे. गेल्या वर्षी या भागात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जमिनीतील पाणी पातळी कमालीची खालावली आहे.
३. त्यामुळे या बागांचा सांभाळ करणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. परिणामी, आठ वर्ष काळजीपूर्वक जपवणूक केलेली मोसंबीची झाडे जड अंतःकरणाने तोडावी लागत आहेत.
४. दरवर्षी खर्च वाढत आहे. त्या प्रमाणात दरवर्षी मोसंबीला भाव मिळत नसल्याने शेतकरी फार मोठ्या संकटात सापडला आहे.