Join us

परदेशात होणारी मोसंबीची निर्यात ठप्प; फळगळती थांबेना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 6:35 PM

आजही देशातील विविध राज्यांत जालन्याच्या मोसंबीचा डंका कायम आहे. परंतू मोसंबी फळगळमुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. वाचा सविस्तर

विष्णू वाकडे 

जालना जिल्ह्यातील मोसंबीला जीआय मानांकन मिळाले आहे. मागील काही वर्षापर्यंत मोसंबी देशा बाहेर विशेषतः बांगलादेशामध्ये निर्यात केली जात होती. सद्य:स्थितीमध्ये निर्यातीला अनुकूल असे वातावरण नसल्याने ही निर्यात काही महिन्यांपासून बंद झाली. असे असले, तरी देशातील विविध राज्यांमध्ये मोसंबीला चांगली मागणी आहे.

आजघडीला २९ हजार ५३७ हेक्टर क्षेत्रावर मोसंबी लागवड करण्यात आली आहे. ऑगस्टच्या सुरुवातील प्रतिटन १० ते ११ हजार रुपये एवढा दर असणाऱ्या मोसंबीला आज रोजी २० ते २५ हजार रुपये प्रतिटन एवढी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.

फळगळतीमुळे मोसंबी उत्पादकांचे मात्र प्रचंड नुकसान झाल्याने मोसंबीचा विमा, तसेच प्रति हेक्टरी किमान एक लाखाच्या वरती नुकसान भरपाई मिळायला हवी, अशी अपेक्षा उत्पादकांकडून व्यक्त केली जात आहे.

२०१६ मध्ये जिल्ह्यातील मोसंबीचे क्षेत्र झपाट्याने घसरून १६ ते १७ हजार हेक्टरवर हे क्षेत्र घेऊन ठेवले होते. त्यानंतर मात्र, चार-पाच वर्षे गेल्यानंतर हळूहळू या क्षेत्रामध्ये सुधारणा होत आहे.

गेल्या वर्षी मोसंबीच्या लागवडीमध्ये फार मोठी वाढ झालेली नाही. फळ पिकांमध्ये निर्माण झालेल्या संकटामुळे मोसंबी लागवडीकडेशेतकरी वळत असल्याचे पुन्हा पाहायला मिळत आहे.

जालना मोसंबी मार्केटमध्ये आंबे बहराचा विक्री हंगाम सुरू झाला आहे. दिवसाकाठी ७०-८० टनांची आवक आता शेकडो टनामध्ये झाली आहे. या वर्षी साडेतीन लाख टन मोसंबीचे उत्पादन अपेक्षित आहे.

जिल्ह्यातून मोसंबी जाते 'या' ठिकाणी

मुंबई, पुणे, नाशिक, दिल्ली, जयपूर, कानपूर, बनारस, अलाहाबाद लुधियाना, जालिंदर या ठिकाणी निर्यात केली जाते.

मोसंबीचे क्षेत्र वाढले

जिल्ह्यातील मोसंबीची बांगलादेशमध्ये पेट्रोपोल बेनेपोल सीमेवरून निर्यात होते. जवळपास महिनाभरापासून हा व्यापार ठप्प झालेला आहे. जिल्ह्यातून दिल्ली येथे मोसंबी पाठवण्यात येते. यानंतर तेथून निर्यात केली जात आहे. मोसंबी निर्यातीमधून उत्पन्नाची आकडेवारी बघता जवळपास १६ ते १७ कोटीची उलाढाल यामध्ये होते.- भास्करराव पडूळ, निर्यातदार

जिल्ह्यात मोसंबीचे क्षेत्र वाढत आहे. जिल्ह्यातून जवळपास ९ लाख टनाच्या वर मोसंबी निर्यात झाली आहे. उर्वरित मोसंबी स्थानिक मार्केटमध्ये विकली जाते. निर्यात झालेल्या मोसंबीतून सर्व शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. - नाथा घनघाव, जालना.

टॅग्स :शेती क्षेत्रफळेजालना जिल्हा परिषदशेतकरीशेती