Join us

बहुतांशी शेतकरी बांधवांचा यंदा खरीपातील ऊस मोडला; कापूस, तुरीवर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 12:33 PM

७० हजार हेक्टरातील पेरण्या पूर्ण : विहीर, बोअरची पाणीपातळी वाढली

यावर्षी जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरु केली. १८ जूनपर्यंत गेवराई तालुक्यातील १३ महसूल मंडळातील तब्बल ७० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक कापसाची लागवड ६२ हजार हेक्टरवर पूर्ण झाली आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १ लाख ४६ हजार ५४० हेक्टर क्षेत्र असून यापैकी १ लाख ३४ हजार ७३७ हेक्टर पेरणीलायक क्षेत्र आहे. यापैकी १ लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा होण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने मृग नक्षत्रातच कपाशीची लागवड झालेली आहे. सध्या दोन-तीन दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी या पिकाच्या अंतरमशागतीच्या कामांची लगबग सुरु केली आहे.

यामध्ये बैलपाळी, खुरपणी कामे करताना शेतकरी दिसत आहेत. बाजरी, भुईमूग, सोयाबीनसह अन्य खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी प्रयत्नात आहे. त्यामुळे शेतशिवार गजबजलेली दिसून येत आहे. तालुक्यात आतापर्यंत १८४ मिमी पाऊस झाला असून गतवर्षीच्या तुलनेत या कालावधीत अधिक पाऊस पडला आहे. परिणामी जलसाठ्यात वाढ झाल्याने विहिर, बोअरची पातळी वाढत चालली आहे.

१३ महसूल मंडळातील खरीप पेरा

बीड जिल्ह्यात आतापर्यंत १३ महसूल मंडळात कापूस ६१ हजार ७३७, तूर ४ हजार ७३५, मूग ५२४, बाजरी ४१७, मका ३५५, सोयाबीन ९०६, उडीद ५६ व अन्य असा एकूण ६८ हजार ३७६ हेक्टर पेरा झालेला आहे.

खरीप पिकाच्या क्षेत्रात वाढ होणार !

शेतकऱ्यांमधून सर्वाधिक कापूस लागवडीला प्राधान्य दिले जात आहे. दोन वर्षापासून भाव चांगला मिळत असल्याने तूर पिकांचा पेरा वाढणार आहे. मागील दोन वर्षे पडलेल्या अत्यल्प पावसामुळे तालुक्यातील हजारो हेक्टरवरील ऊस मोडला असून यावर्षी खरीप पिकाच्या क्षेत्रात वाढीची शक्यता असल्याचे गेवराईचे कृषी मंडळ अधिकारी सतीश केसभट, उमापूर मंडळाचे कृषी मंडळ अधिकारी रवींद्र मुंडे यांनी सांगितले.

तालुक्यात १८४.३० मिमी पाऊस; मंडळनिहाय पावसाची आकडेवारी

गेवराई - १६५ मिमी.

मादळमोही - १५०.९० मिमी.

उमापुर - १४५.५० मिमी

चकलांबा - १७० मिमी.

सिरसदेवी - १९७.८० मिमी.

धोंडराई - २७७.१० मिमी.

जातेगाव - १६७.३० मिमी.

तलवाडा - १७३.१० मिमी.

रेवकी - २०३.९० मिमी.

पाचेगाव -  १८९.७० मिमी.

हेही वाचा - शेतशिवरात आढळणाऱ्या बहुपयोगी पळसाच्या पानांचे आरोग्यदायी फायदे

टॅग्स :कापूसऊसतूरशेतकरीशेतीखरीप