Join us

MPKV Vice Chancellor PG Patil : "विद्यापीठाने संशोधित केलेल्या उसाच्या वाणामुळे तुमच्या कारखान्यांचे धुराडे चालू; आम्हाला विसरू नका"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 1:57 PM

MPKV Vice Chancellor PG Patil : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने जवळपास १७ व्हरायटी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या व्हरायटीच्या जिवावर साखर कारखाने सुरू आहेत पण याचा विसर साखर कारखान्यांना पडत आहे अशी खंत राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी व्यक्त केली.

Sugar Factory and MPKV Rahuri : शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी शेतकऱ्यांना नवे वाण आणि तंत्रज्ञान विकसित करून देण्याचे काम कृषी विद्यापीठे करत असतात. १९३२ साली सुरू झालेल्या पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्राच्या मार्फत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने जवळपास १७ व्हरायटी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या व्हरायटीच्या जिवावर साखर कारखाने सुरू आहेत पण याचा विसर साखर कारखान्यांना पडत आहे अशी खंत राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी व्यक्त केली.

दरम्यान, पुण्यातील कृषी महाविद्यालयात साखर व संलग्न उद्योगांची चक्रीय अर्थव्यवस्था आणि पर्यावरणपूरक शाश्वततेसाठी योगदान परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी साखर उद्योगातील अनेक तज्ज्ञ, विद्यापीठाचे  कुलगुरू,  साखर आयुक्त, साखर कारखानदार उपस्थित होते. "जमिनीची उत्पादकता कमी होणे, क्षारपड जमिनी होणे, साखर उतारा कमी येणे आणि उसाचा चांगला दर न मिळणे असे अनेक अव्हाने ऊस उत्पादक शेतकऱ्यासमोर आहेत. यामुळे शेतकरी तोट्यात जात असून या प्रश्नावर विचारमंथन व्हावं आणि नवी तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर धोरणात्मक पातळीवर काहीतर बदल व्हावेत या अनुषंगाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

ऊस शेती आणि साखर उद्योगामध्ये अनेक गोष्टींची सुधारणा करण्यावर काम सुरू असल्याचे मत साखर आयुक्त कुणाल खेमनार यांनी व्यक्त केले. आयुक्त खेमनार म्हणाले, "ऊस शेती करत असताना पाणी ट्रीटमेंट महत्त्वाचे आहे. साखर उद्योगामध्ये डिजीटल फार्मिंग, तंत्रज्ञान, सेंद्रीय शेती, एकात्मिक शेती या पद्धतीचा वापर करून मातीचे आरोग्य सुधारले पाहिजे. त्याशिवाय नवे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मर्यादा येतात. साखर उद्योगांना आर्थिक झळ न बसता कमीत कमी खर्चामध्ये वर्षभर कसा नफा कमावता येईल त्यावर साखर आयुक्तालय काम करत आहे."

काय म्हणाले कुलगुरू प्रशांतकुमार पाटील?"साखर परिषद घेत असताना अनेकदा साखर कारखान्यांना विद्यापीठाचा विसर पडतो. विद्यापीठाच्या अंतर्गत पाडेगाव ऊस संशोधन केंद्र असून त्याला ९२ वर्षे पूर्ण झालेली आहेत. या ठिकाणी १३२ हेक्टर जमीन आहे. या संशोधन केंद्रातून १७ व्हरायटी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली आहे. काही शेतकऱ्यांनी आपल्या घरांना या वाणाची नावं दिली आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांनी विद्यापीठाच्या संशोधनाला विसरू नये."

"महाराष्ट्रात ८६ टक्के उसाचे क्षेत्र हे राहुरी कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव संशोधन केंद्रातून तयार झालेल्या व्हराटीच्या लागवडीखाली आहे. तर देशातील ५६ टक्के उस क्षेत्रावर पाडेगाव संशोधन केंद्राने विकसीत केलेल्या व्हरायटी आहेत. तर विद्यापीठाने अलीकडेच संशोधित केलेली "१३०७ फुले" ही व्हरायटी सात राज्यांमध्ये प्रथम आलेली आहे. विद्यापीठाने संशोधित केलेल्या व्हरायटी आज महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, झारखंड या राज्यांमध्ये गेलेल्या आहेत. विद्यापीठाने संशोधित केलेल्या उसाच्या वाणामुळे तुमच्या कारखान्यांचे धुराडे चालू आहेत. साखर कारखाने म्हणून तुम्ही विद्यापीठाच्या संशोधनाला विसरू नका" असं मत पाटील यांनी व्यक्त केले.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीऊससाखर कारखाने