Pune : राज्यातील उसाच्या गाळप हंगामाला येणाऱ्या दीड महिन्यात सुरूवात होणार आहे. मंत्री समितीच्या बैठकीमध्ये १५ नोव्हेंबर रोजी साखर कारखाने सुरू करण्याचे एकमताने मंजूर करण्यात आले. त्यामुळे यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत १५ दिवसांनी उशिरा साखर कारखाने सुरू होणार आहेत.
साखर कारखाने सुरू होण्याआधीच राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी पुढील सात दिवसांत केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा साखरेचे एमएसपी वाढवणार असल्याचे आश्वासन दिले आहे. साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ झाली तर साखर कारखान्यांना चांगला दर मिळून शेतकऱ्यांचा उसाचा चांगला दर मिळण्यास मदत होऊ शकते.
(Sugar MSP Latest Updates)
केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकींच्या आधीच उसाला प्रतिटन २५० रूपये हमीभावामध्ये वाढ केली असून यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना प्रतिटन ३ हजार ४०० रूपयांप्रमाणे दर मिळणार आहे. पण केंद्राने २०१८ सालापासून साखरेची किमान आधारभूत किंमत म्हणजेच एमएसपी वाढवला नसल्याची कारखानदारांची तक्रार होती.
दरम्यान, दरवर्षी केंद्र सरकारकडून उसाच्या एफआरपीमध्ये वाढ करण्यात येते पण साखरेच्या किमान आधारभूत किंमती वाढत नसल्यामुळे साखर कारखाने अडचणीत येण्याची शक्यता आहे. यंदा आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. चीन देशातील साखरेचे उत्पादन हे २०२४-२५ या गाळप हंगामात ६ लाख टनाने वाढण्याचा अंदाज असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर दबावात राहण्याची शक्यता आहे.
"केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना भेटून उसाच्या एफआरपीप्रमाणेच साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याची मागणी आम्ही केली. त्यावेळी पुढील सात दिवसांत साखरेचा एमएसपी वाढवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे उसाचा चांगला दर मिळणार आहे" अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. सातारा येथे जिल्हा बँकेच्या अमृतमहोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते.
(Maharashtra Sugar Industry and Farmers Sugarcane FRP Latest Updates)