नवी दिल्ली : देशातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनेपंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत (पीएमएमवाय) मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा दुप्पट वाढवून २० लाख रुपये केली आहे.
केंद्रीय वित्त मंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. या वाढीच्या माध्यमातून आम्ही मुद्रा योजनेचा सर्वकश उद्देश पुढे नेऊ इच्छितो, असे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे.
यासंबंधीची अधिसूचना गुरुवारीच जारी झाली असल्याची माहिती देण्यात आली. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला तेव्हा म्हटले होते की, पंतप्रधान मुद्रा योजनेची विद्यमान दहा लाख रुपयांची कर्जमर्यादा वाढवून २० लाख रुपये केली जाईल.
ज्यांनी 'तरुण' श्रेणीअंतर्गत घेतलेले आधीचे कर्ज नियमितपणे फेडले आहे. त्यांना वाढीव मर्यादेचा लाभ मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०१५ रोजी ही योजना सादर केली होती.
कुणाला किती कर्ज?
- बिगर-कॉर्पोरेट, बिगर-कृषी लघु व सूक्ष्म उद्योजकांच्या उत्पन्नाच्या साधनासाठी दहा लाख रुपयांपर्यंत सुलभ व हमीदारमुक्त सूक्ष्म कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश होता.
- सध्या या योजनेत ३ श्रेणीत कर्ज दिले जाते त्यात शिशु (५० हजार रुपयांपर्यंत), किशोर (५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत) आणि तरुण (१० लाख रुपयांपर्यंत) यांचा समावेश आहे.