राहुल नवघरे
बीड : ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख आणि कायम दुष्काळात राहिलेला बीड(Beed) जिल्हा, हा ऊर्जा उद्योग(Energy Industry) जिल्हा बनू पाहत आहे. पवनचक्की ऊर्जेचे २८५ प्रकल्प जिल्ह्यात उभारलेले असताना आता सौर कृषी वाहिनी योजना (Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana) आपले पाय बीडमध्ये रोवत आहे.
जिल्ह्यातील तब्बल ४९ गावांमध्ये विविध १६ कंपन्यांच्या माध्यमातून सौर(Solar) ऊर्जेचे प्रकल्प उभे राहत आहेत. यातून तब्बल १८२ मेगावॅट वीजनिर्मिती अपेक्षित आहे. मार्च अखेरपर्यंत यांचे काम पूर्ण होणार आहे.
अपारंपरिक स्रोतांचा वापर करून वीजनिर्मितीवर शासनाने जास्त भर दिला आहे. पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जानिर्मितीसाठी शासन आग्रही आहे. राज्यात शेतीसाठी लागणारे पाणी आणि पाण्यासाठी लागणारी वीज याचा खर्च शासनाला परवडणारा नव्हता.
त्यामुळे मुबलक वीज शेतकऱ्यांना देण्यात शासन असक्षम ठरत होते. मात्र, आता घराच्या छतावर वीजनिर्मितीसाठी ७८ हजार रुपयांची सबसिडी देऊन नागरिकांना घरीच वीजनिर्मिती करण्याचा पर्याय दिला, त्यानंतर शेतीसाठी किमान दिवसा सौर कृषी पंप योजना देऊन ३ एचपीची पाण्याची मोटार चालेल एवढे सोलार पॅनल शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून मिळत आहे.
बीड जिल्ह्यात सौर कृषी पंपासाठी २१ हजार शेतकऱ्यांनी अर्जदेखील महावितरणकडे केले आहेत. त्यापैकी चार हजार शेतकऱ्यांपर्यंत कृषी पंप पोहोचले असून, पिकांना दिवसाच्या वेळी पाणीपुरवठाही केला जात आहे.
एका मेगावॅटसाठी तीन एकर जागा
बीड जिल्ह्यातील ४९ गावांमध्ये राज्यस्तरीय १६ कंपन्या महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या, तसेच भाडेतत्वावर घेतलेल्या जागांवर हा प्रकल्प उभा राहणार आहे. एक मेगावॅट वीजनिर्मितीसाठी साधारण तीन एकर जागा लागते. मार्चअखेरपर्यंत हा ४९ गावांतील वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना शासनाकडून कंपन्यांना दिला आहे. त्यामुळे तीन कंपन्यांनी प्रगतिपथावर काम सुरू केले आहे. या
कंपन्या करताहेत सौर ऊर्जेवर काम
* रिलायन्स इंडस्ट्रिअल लिमिटेड * यश कन्स्ट्रक्शन कंपनी * इंटिग्रेटेड इंडक्शन पॉवर * खंडोबा डिस्टिलरी प्रा.लि. * गंगामाउली शुगर, अक्षय ट्रेडिंग * अवादा एनर्जी प्रा.लि. * नवकार फायबर * कालिका जिनिंग * नथुमल वासुदेव यांच्यासह इतर सहा कंपन्यांचा समावेश आहे.
तालुकानिहाय प्रकल्पाची आकडेवारी
तालुका | गावे | मेगावॅट |
अंबाजोगाई | ८ | २४ |
बीड | ३ | १० |
धारूर | २ | ४ |
गेवराई | १० | ३५ |
केज | ६ | २२ |
माजलगाव | १ | १ |
परळी | ४ | २६ |
पाटोदा | १ | ३ |
शिरूर | ३ | ९ |
वडवणी | ३ | १५ |
शेतीला मिळणार वीजपुरवठा
हा वीजनिर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर महावितरणकडून ही वीज शेतकऱ्यांच्या शेतीला सातत्याने वीजपुरवठा करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे सध्याच्या वीजपुरवठ्यावरील भार कमी होईल. - पी. एम. राजपूत, अधीक्षक अभियंता, महावितरण