Join us

कमी खर्चात चांगल्या उत्पादनासाठी कापसात मल्चिंग करा- डॉ. एस. एस. माने यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 6:24 PM

कापसासाठी अच्छादन हा अतिशय चांगला पर्याय आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती

नुकताच गट शेती संघाचा २३८ वा द्वादस मेळावा मौजे डोणगाव तालुक्यात जाफराबाद जि. जालना येथे राजेंद्र घोडके यांच्या शेतात पार पडला. यावेळी एका खाजगी कंपनीचे मुख्य कापूस पैदासकार डॉ. एस.एस. माने यांनी सांगितले की, अति घन लागवड कापूस पिकात कमी मजुरीत तसेच अत्यंत कमी खर्चात दीडपट उत्पादन घेता येऊ शकते.

कापसासाठी अच्छादन हा अतिशय चांगला पर्याय आहे. हे राजू घोडके यांच्या शेतातील आच्छादन केलेल्या कापसाने दाखवून दिले आहे. अच्छादन केल्यास कापूस पिकातील अंतर मशागत करण्याची गरज पडत नाही.

कापसामध्ये रोग व कीड अत्यंत कमी होऊन उत्पादन तसेच कापसाची प्रत सुधारण्यास मदत मिळते. हे राजू घोडके यांनी दाखवून दिले आहे. यावेळी डॉ. भगवानराव कापसे यांनी गट शेतीतूनच सामान्य शेतकऱ्यांचा विकास कसा होऊ शकतो. हे आपल्या गट शेतीने भोकरदन, जाफराबाद तसेच बदनापूर तालुक्यात प्रत्यक्ष दाखवून दिले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

कापसाची पातेगळ तसेच आंबा, मोसंबी मधील फळगळ हे फिजिओलॉजिकल कारणासह निर्यातीबाबत सविस्तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय असल्यास आंबा अति घन लागवड केल्यास एकरी सहा ते आठ लाख रुपये पर्यंत उत्पादन मिळू शकते. गुगळे, अशोकराव सूर्यवंशी व अनेक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात सकाळची न्याहरी व शिवार फेरीचा कार्यक्रम सातेफळ तालुका जाफराबाद येथील माजी उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे यांच्या अंबा बागेत संपन्न झाला. याशिवाय शिवार फेरीच्या कार्यक्रमात अंबा बागेची छाटणी तसेच चिकू बागेत ड्रीप व्दारे करावयाच्या सिंचन पद्धती विषयी शास्त्रीय माहिती भगवानराव कापसे यांनी दिली.

तर कार्यक्रमांत मका पिकाविषयी लागवड, खते व कीडनाशकाविषयी सविस्तर माहिती प्राध्यापक मुजफ्फर सय्यद यांनी दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अकोला देव येथील लक्ष्मण सावडे,  केदरखेडचे पंढरीनाथ पालोदे, वालशाचे ज्ञानेश्वर मिसाळ, देळेगव्हाण येथील नागोराव कापसे, आसरखेडचे भवर आदी गटप्रमुखांनी आपल्या गावातील यावर्षीच्या पिका विषयीचा सविस्तर अहवाल सादर केला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाऊराव आटपळे यांनी केले तर आभार प्रदर्शन नयन शेख यांनी मानले. या मेळाव्यात विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील कराड बंधू प्रसिद्ध कापूस व डाळिंब बागायतदार यांनी सुद्धा आच्छादन केलेल्या कापसाचे उत्पादकता पाहून आश्चर्य व्यक्त केले. कार्यक्रमास दरेकर, बाबुराव रेवगडे, गवळी, नईम शेख, जानकीराम सूर्यवंशी, विलास पुंगळे व इतर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसआंबालागवड, मशागतशेतकरीशेती