आज शेतीत बदल होऊन नवनवीन आधुनिक पद्धतीने शेती केली जात आहे. शिवाय पिकांमध्ये देखील बदल होऊन भरगोस उत्पन्न देणारी पिके शेतकाऱ्यांकडून घेतली जात आहे. मात्र एकीकडे यंदाच वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्ह्णून साजरे होत असताना दुसरीकडे तृणधान्य म्हणून ओळखली जाणारी महत्वाची पिके असलेल्या नागली, वरई खुरासणी ही पिके जणू काही दुर्मिळच झाली आहेत.
महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात नागली, वरई, खुरासणी ही पिके घेतली जातं आहेत. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पथम सुरगाणा, कळवण आदी आदिवासी पट्ट्यात नागलीला कणसारा' माउली म्हणून पुजले जाते. पूर्वी मोठ्या प्रमाणावर नागली, वरई, खुरासणी ही पिके घेतली जात होती. मात्र मागील काही वर्षात यात पूर्णतः बदल झाला असून ही पिके आता दिसेनाशी झाली आहेत. काही मोजक्या भागात नागली वरईचे उत्पादन घेतले जात आहे. एकीकडे मिलेटचे वर्ष साजरे होत असताना दुसरीकडे मात्र ती पिकेच हद्दपार होताना दिसत आहेत. या तृणधान्य पिकांना डावलून आधुनिक पिके घेण्याकडे कल वाढल्याचे चित्र आहे. परिणामी आज पुन्हा मिलेटच्या माध्यमातून या पिकांचे महत्व पटवून दिले जात आहे.
साधारणपणे पावसाळ्यात चार महिने नागली आणि वरई हे पीक घेतले जाते. तर खुरासणी सप्टेंबर ऑक्टोबर नोंव्हेबर या महिन्यात घेतले जाते. शेतकऱ्यांनी ही पिके बाजूला सारत अधिक आर्थिक उत्पन्न देणाऱ्या पिकांना आपलस केलं. शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांमध्ये बदल करून जास्त उत्पन्न देणारी पिके घेतली जाऊ लागली. हळूहळू नागली, वरई या पिकांकडे दुर्लक्ष होऊ लागले. शेतकऱ्यांनी या पिकांकडे पाठ फिरवून इतर भाजीपाला पिकांना पंसती दिली आहे. यामुळे सद्यस्थितीत या पिकांच्या उत्पादनातही घट होऊ लागली आहे. अशा स्थितीत आता शहरी भागात नागली व वरईला मोठी मागणी वाढली आहे.
नागली, वरई पिकांचे महत्व
विशेषतः या दोन्ही पिकांना जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. मात्र उत्पादन चांगले मिळते. ही दोन्हीही पिके पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने दोन्ही पिके सेंद्रिय शेतीत येतात. या पिकांवर कोणतीही रासायनिक फवारणी, खतांचा वापर केला जात नाही.नागलीचा उपयोग भाकरी तसेच पापड बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच सध्या हॉटेल मध्ये नागली पापड, बिस्कीटला जास्त मागणी आहे. वरईचा वापर ग्रामीण व शहरी भागामध्ये उपवासासाठी केला जातो. यंदा मिलेट वर्ष असल्याने नागली आणि वरई पिकांचे महत्व पटवून दिले जात आहे. नागली आणि वरई ही दोन्ही पिके शरीरासाठी किती महत्वाची आहेत, हे समजून घेतलं जात आहे. मात्र यासाठी शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन देणं गरजेचे असणार आहे. कारण आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकांकडे कल वाढला असल्याने ही दोन्ही पिके दुर्लक्षित होत चालली आहेत. याकडे गांर्भीयाने पाहणे आवश्यक आहे.