आष्टी (श.) (वर्धा) : एक्झिम फार्मर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री (ईफिक्की), महाऑरेंज आणि निर्यातदार गटांनी एकत्र येत ओडीओपी, तसेच जी. आय. टॅग नागपुरी संत्र्यांची आणि मिश्र भाजीपाल्याच्या निर्यातीची खेप दुबईसाठी पाठविण्यात आली आहे.
कारंजा (घाडगे) येथील महाऑरेंजच्या कृषी निर्यात केंद्रातून वाहन रवाना झाले असून, महाराष्ट्रातील कृषी उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचण्याचे ध्येय साध्य केले आहे.
महाऑरेंजच्या कृषी निर्यात केंद्रात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाऑरेंजचे संचालक मनोज जवंजाळ, युनिव्हर्स एक्स्पोर्ट्स आणि व्यवस्थापकीय संचालक प्रवीण वानखडे, सोलसण एक्स्पोर्ट्सचे संचालक चंदन धांदे, न्यू इंडिया एक्स्पोर्टचे संचालक सौरभ यादव व ईफिक्कीच्या संस्थापक सदस्य मध्यमा सवई यांची उपस्थिती होती.
या मान्यवरांनी या वाहनाला हिरवी झेंडी दाखविली. ईफिक्कीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण वानखडे यांनी नागपूर संत्र्यांचा ब्रँड जागतिक पातळीवर प्रस्थापित करण्यासाठी ईफिक्की हे शेतकरी निर्यातदार, कृषी संस्थांना, महिला बचत गट आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदार यांना एकत्रित आणण्याचे काम करत असल्याचे सांगितले.
मनोज जवंजाळ यांनी महाऑरेंजच्या कोल्ड स्टोरेज सुविधेमुळे उत्पादनाची गुणवत्ता टिकवून ठेवली जाते आणि निर्यात प्रक्रियेला गती मिळते, असे सांगून ईफिक्की आणि निर्यातदारांचे कौतुक केले.
ईफिक्की, महाऑरेंज आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यातील सहकार्य हे भारतीय कृषी उत्पादनांना जागतिक बाजारात प्रस्थापित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सशक्त बनवण्यासाठी एक आदर्श मॉडेल ठरल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाला शेतकरी, एवरग्रेन एक्स्पोर्ट, ताज एक्स्पोर्ट, केजीबी एक्स्पोर्ट, अपूर्व जवंजाळ, प्रज्वल रायबोले, नेहा मेश्राम, नक्षित्रा रायपुरे, राजेंद्र नागपुरे, प्रतीक राठी, अंकुर टकले उपस्थित होते. आखाती, युरोपियन, आशियाई देशांमध्ये संत्र्यांच्या निर्यातीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. ही निर्यात खेप महाराष्ट्रातील कृषी व्यापारासाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरली आहे.
सेंद्रिय आणि जीआय-टॅग उत्पादने जागतिक पातळीवर अधिक मागणीला तोंड देत आहेत आणि हा उपक्रम शेतकऱ्यांना उत्तम आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी मोठे पाऊल तरला आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांचा थेट सहभाग आणि त्यातून होणारा शेतकरी सक्षमीकरणाचा आदर्श यामुळे शेतकऱ्यांची निर्यातीच्या प्रक्रियेत भाग घेण्याची प्रवृत्ती वाढेल. - श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज कृषी निर्यात केंद्र, कारंजा (घाडगे)