Nal Jal Mitra Scheme :
छत्रपती संभाजीनगर :
जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर या कामांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत गवंडी, प्लंबर, मेकॅनिक, फिटर व इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर याप्रमाणे ३ 'नल जलमित्र' नेमले जाणार आहेत.
यामुळे कौशल्य असलेल्या तरुणाला गावातच रोजगार मिळणार आहे. देखभाल व दुरुस्तीसाठी प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत ३ नल जलमित्रांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रशिक्षणाकरीता इच्छुकांनी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केले आहे.
'जलजीवन' अंतर्गत पाणीपुरवठा योजना निरंतरपणे चालावी. त्यासाठी या योजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ३ नल जलमित्रांची निवड करण्यात येणार असून प्रशिक्षणासाठी १:३ याप्रमाणे ९ उमेदवारांचे नामनिर्देशन ग्रामपंचायतींना 'ॲप' वर भरावयाचे आहे.
ग्रामपंचायतीने सादर केलेल्या नामनिर्देशनामधून राज्यस्तरावर उमेदवाराची निवड केली जाणार आहे. त्यांना राज्यस्तरावर नियुक्त सहायकारी संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
तांत्रिक मनुष्यबळ देणार
या ट्रेडसाठी गावातील अनुभवी व विहीत पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे. या माध्यमातून पाणीपुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती व शाश्वततेसाठी ग्रामपंचायत स्तरावर तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे, यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी ग्रामपंचायतीकडे संपर्क साधावा, असे जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले व पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी कळविले आहे.