Join us

‘अतिवृष्टीच्या मदत यादीतून श्रीरामपूरच्या शेतकऱ्यांची वगळली नावे’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 2:01 PM

शेतकरी संघटनेचा आरोप. पंचनामा फॉर्म भरूनही तालुक्यातील असंख्य शेतकरी मदतीपासून प्रशासनाने वंचित ठेवल्याचा आरोप

राज्य सरकारने 2022-23 मधील अतिवृष्टीसाठी अनुदान शेतकयांना सरसकट देण्याचा निर्णय घेतला आहे,  पण स्थानिक पातळीवरच्या प्रशासनाने या निर्णयाला वाटण्याच्या अक्षता लावल्या असून मदत यादीतून अनेकांची नावे वगळली असल्याचे आरोप शेतकरी संघटनेने केले आहेत. विशेषत: नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात असे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहिले असल्याचे शेतकरी नेत्यांनी निदर्शनास आणले आहे.

 ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेत त्यांनाच मदत देण्यात येईल असे निकष व अटी या अनुदानासाठी घालण्यात आलेल्या आहेत. तथापि शासनाने मात्र सरसकट सर्व शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता. श्रीरामपूर तालुक्यात १० ऑगस्ट २३ रोजी ज्या शेतकयांनी पंचनामे फॉर्म भरले आहेत त्यांची पण नावे यादीतून वगळली असून अशा  सुमारे ४० ते ५० टक्के  शेतकऱ्यांची नावे मदत यादीतून वगळली असल्याचे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे.

ही बाब तहसिलदारांना निदर्शनास आणून देऊनही उपयोग झाला नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून प्रशासनाने लवकरात लवकर दखल न घेतल्यास त्यांना शेतकऱ्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष निलेश शिवाजीराव शेडगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. 

टॅग्स :सरकारी योजनाशेतकरीशेती