केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. काही महिन्यांपासून राज्य सरकारनेही नमो शेतकरी महासन्मान योजनेंतर्गत सहा हजार रुपये देण्याचे जाहीर केले; मात्र एक हप्ता दिल्यानंतर अद्यापही राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही.
केंद्र शासनाकडून देशातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये अनुदान देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही महत्त्वाकांक्षी योजना २०१९ मध्ये सुरू केली होती. केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून वर्षातून तीन वेळा प्रत्येकी दोन हजार रुपये संबंधित पात्र लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात.
याच धरतीवर राज्य शासनाकडूनही केंद्राप्रमाणे नमो शेतकरी योजनेची वर्षाला सहा हजार रक्कम तीन टप्प्यात शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे राज्य सरकारने केंद्र शासनाच्या १६ व्या हप्त्यासोबत शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता वितरित केला होता.
जून महिन्यात केंद्र शासनाने लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात १७ वा पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता वितरित केला आहे; मात्र अद्यापही राज्य शासनाचा दोन हजार रुपयांचा हप्ता वितरित करण्यात आला नाही.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाकडून विविध घटकांसाठी लाभाच्या योजना जाहीर केल्या जात आहेत; मात्र नमो शेतकरी योजनेचा निधीचा दुसरा हप्ता वितरित करताना राज्य सरकार आखडता हात घेत आहे.
शेतकऱ्यांसाठी हात आखडला- नमो शेतकरी योजनेचा राज्य सरकारने शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये केंद्र सरकार प्रमाणे देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य असे मिळून, वर्षाला बारा हजार रुपये मिळणार आहेत. केंद्र सरकारने १६ वा हप्ता टाकल्यानंतर राज्य सरकारनेही त्यासोबत दोन हजार रुपयांचा हप्ता टाकला होता.- जून महिन्यात केंद्र सरकारने १७ वा हप्ता वितरित केला; मात्र राज्य सरकारने अद्यापही २ हजार रुपयांचा हप्ता वितरित केला नाही. एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसारख्या लोकप्रिय योजनांची घोषणा केली जात आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता देताना राज्य सरकार आखडता हात घेत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.