Nano Urea : युरिया आणि शेती हे जणू समीकरणच झाले आहे. कुठल्याही पिकासाठी शेतकरी युरिया खताला प्राधान्य देत असतात. मात्र हल्ली खतांच्या किमती देखील भरमसाठ वाढल्याने असल्याने शेतकरी हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे प्रथमच युरिया हे नॅनो (Nano Urea) प्रकारात आले असून ड्रोनद्वारे सुद्धा त्याची फवारणी करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयीस्कर होणार आहे.
नुकतंच नाशिक (Nashik) जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत इगतपुरी तालुक्यातील शिरसाटे गावातील प्रगतशील शेतकरी राजेंद्र केदार यांच्या शेतातील टोमॅटो पिकावर ड्रोनद्वारे (Drone) नॅनो युरिया फवारणी करण्यात आली. यांनतर नॅनो युरिया नेमकं काय आहे? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित केला. तर इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेडने (इफ्को) देशातील पहिला नॅनो लिक्विड युरिया प्रकल्प उभारला आहे. नॅनो युरिया हे युरिया (Urea) खताचाच एक महत्वाचा प्रकार मानला जात असून किमतीसह शेतकऱ्यांना परवडणारा, वेळेची बचत करणारा ठरणार असल्याचे दिसते आहे. आजच्या घडीला युरियाची 45 किलोची गोणी 3800 रुपयांना जाते. शेतकऱ्यांना सबसिडी मिळाल्यानंतर ती 265 रुपयांना जाते. मात्र नॅनो रुपयाची अर्धा लिटरची बॉटल 225 रुपयांना जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. एका अर्धा लिटरमध्ये जवळपास एक एकरवरील पिकांवर फवारणी केली जाते. मात्र पिकांनुसार हे प्रमाण बदलत जाईल.
नॅनो युरिया म्हणजे काय?
नॅनो युरिया व डीएपी हे एक आधुनिक नत्र व स्फुरदयुक्त द्रवरूप खत आहेत. जी पिकांच्या वाढीसाठी व विकासासाठी आवश्यक असणारे नत्र व स्फुरद हे मुख्य अन्नद्रव्ये पुरवतात. नॅनो युरिया हे एक द्रवरूप नत्रयुक्त खत असून त्यामध्ये 4 टक्के नत्र नॅनो कणांच्या स्वरूपात असतो. त्यामधील नॅनो नत्र कणांचा आकार हा 30 ते 50 नॅनोमीटर इतका असतो.नॅनो युरिया मध्ये नत्राचे कण हे अतिसूक्ष्म असल्यामुळे ते एकसंघ असतात तसेच त्यांचे पृष्ठभागीय क्षेत्रफळ हे पारंपारिक युरिया पेक्षा 10000 पट जास्त असल्यामुळे त्याची कार्यक्षमता 90 टक्क्यांपर्यंत असते जी पारंपारिक युरियामध्ये 30 ते 50 टक्के असते.
नॅनो युरियाचे फायदे काय?
नॅनो युरिया व नॅनो डीएपीच्या वापरामुळे पिकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होते, खर्चात बचत होते आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ होते. पिकांची पौष्टिकता आणि गुणवत्ता सुधारते नॅनो युरियाची एक बाटली 500 मिली आणि एक युरियाची गोणी 45 किलो यांची कार्यक्षमता समान आहे. त्यामुळे पारंपारिक युरिया खतांवरील शेतकऱ्यांचे अवलंबत्व कमी होते. पारंपरिक युरियाच्या तुलनेत नॅनो युरिया कमी लागतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांची साठवणूक, वाहतूक यावरचा खर्च कमी होतो. शिवाय हवा पाणी आणि जमीन यांची हानी थांबते. युरिया हे स्वदेशी आणि विनाअनुदानित खत आहे.
नॅनो युरियाची फवारणी कशी करावी?
विशेषतः ड्रोन द्वारे नॅनो युरियाची फवारणी केली जात आहे. मात्र ड्रोन नसल्यास कशी फवारणी करावी हे देखील महत्त्वाचं आहे. सूक्ष्म कणांसाठी व पाने पूर्ण ओली होण्यासाठी फ्लॅट फॅन किंवा कट नोझल असलेल्या फवारणी पंपाचा वापर करावा. फवारणी सकाळी किंवा सायंकाळी करावी जेव्हा पानांवर होल नसेल. जर इफको नॅनो युरियाची फवारणी केल्यानंतर 2 तासांच्या आत पाऊस पडला तर पुन्हा फवारणी करावी. नॅनो युरिया से द्रावण तयार करण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा. तसेच फवारणीच्या वेळी मास्क व हात मोजे वापरावेत, त्याचबरोबर कोरड्या ठिकाणी साठवण करावी.